Breaking News

भाजपाचे आ.परिचारक यांच्या छायाचित्राचे दहन

अहमदनगर, दि. 27 - भारतीय जनता पार्टीकडे देशप्रेमी व धर्मप्रेमी म्हणून पाहिले जात होते. मात्र केंद्रात व राज्यात सत्ता आल्यानंतर भाजपाचे धर्मप्रेम व देशप्रेमाची संकल्पना बदलली आहे. आमदार  म्हणून अत्यंत जबाबदारीने जनतेने निवडून दिल्यानंतर अशा पद्धतीने बेताल वक्तव्य भाजपाचे लोकप्रतिनिधी सर्वत्र करत आहेत. जे जवान आपल्या जीवावर उदार होवून देशाचे संरक्षण करत आहेत, त्यांच्याविषयी व त्यांच्या कुटूंबियांबद्दल भाजपाचे आमदार प्रशांत परिचारक यांनी अंत्यत निच पद्धतीने वक्तव्य केले आहे. देशाचे संरक्षण करणार्‍या जवानांविषयी असे बेताल वक्तव्य करणे ही अत्यंत शरमेची बाब आहे. एवढ्या खालच्या पातळीवर जाऊन भाजपाने सर्व पातळ्या ओलांडल्या आहेत. त्यामुळे आ.प्रशांत परिचारक यांनी त्वरित राजानामा द्यावा, अशी मागणी शिवसेनेच्यावतीने माजी आमदार अनिल राठोड यांनी केली. सोलापुरचे भाजपाचे आमदार प्रशांत परिचारक यांनी सिमेवरील जवानांविषयी बेताल वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ नगर शहर शिवसेनेच्यावतीने आ.परिचारक यांच्या छायाचित्रास जोडे मारो आंदोलन करुन त्यांच्या छायाचित्राचे दहन केले. माजी आ.अनिल राठोड यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या निषेध आंदोलनात शहरप्रमुख दिलीप सातपुते, माजी शहरप्रमुख संभाजी कदम, सभापती सचिन जाधव,  संतोष गेनप्पा आदिंसह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.