Breaking News

स्पर्धा परीक्षेतही लातूर पॅटर्न निर्माण करू-जाधव

लातूर (प्रतिनिधी), दि. 26 -स्पर्धा परीक्षेतही लातूर पॅटर्न निर्माण करण्याची क्षमता येथील विद्यार्थ्यांमध्ये आहे, असे प्रतिपादन प्राचार्य अनिरुध्द जाधव यांनी येथे केले. 
स्पर्धा परीक्षेची तयारी करणार्‍या विद्यार्थ्यांसाठी येथील राजर्षी शाहू महाविद्यालयात द युनिक अ‍ॅकॅडमीच्यावतीने  आयोजित दोन दिवसीय स्पर्धा परीक्षा कार्यशाळेचा समारोप करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. यावेळी डॉ. दि. बा. गोरे, प्राचार्य डॉ. एस. डी. साळुंके, उपप्राचार्य डॉ. पी. एन. सगर, डॉ. महादेव गव्हाणे व अकॅडमीचे प्रा. प्रशांत पाटील उपस्थित होते.
या कार्यशाळेत पहिल्या सत्रात कार्यशाळेचे उद्घाटन प्रा. नागेश गव्हाणे यांच्या हस्ते झाले. दुसर्‍या सत्रात राज्यशास्त्र व मानवी हक्क या विषयावर प्रा. हर्षल लंवगारे, तिसर्‍या सत्रात भूगोल व पर्यावरणशास्त्र या विषयावर प्रा. दिनेश ताठे, चौथ्या सत्रात विज्ञान व तंत्रज्ञान या विषयावर प्रा. अजित चहाळ, पाचव्या सत्रात अर्थशास्त्र  विषयावर प्रा. प्रशांत पाटील, सहाव्या सत्रात इतिहास या विषयावर प्रा. निवृत्ती पाटील, सातव्या सत्रात चालू घडामोडी या विषयावर प्रा. इंद्रजित यादव, आठव्या सत्रात मानव संसाधन विकास विषयावर प्रा. विभोर बोटे, नवव्या सत्रात मराठी व इंग्रजी विषयावर प्रा. निवृत्ती पाटील, दहाव्या सत्रात प्रा. राजेंद्र लाड यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून मार्गदर्शन केले.
जाधव म्हणाले, विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षाविषयक विविध सोयी,मार्गदर्शन उपलब्ध केले आहे, विद्यार्थीही त्यास अनुकूल प्रतिसाद देत आहेत. अशाच पध्दतीने परिश्रम घेतल्यास पुढील काळात याच विद्यार्थ्यांतून एक नवा प्रशासकीय वर्ग तयार होईल. महाराष्ट्राच्या नकाशावर प्रशासकीय लातूर पॅटर्न निर्माण होईल, असे ते म्हणाले.