पोखरतेय व्यवस्था!
दि. 28, फेब्रुवारी - देशात भ्रष्टाचाराचा नंगानाच जोरात सुरू आहे. मात्र या नंगानाचाला काही क्षेत्र अपवाद होते. ज्यात लष्करी क्षेत्राचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल. लष्कराची करडी शिस्त, सदैव दक्ष असणारे, भ्रष्टाचाराचा मागमूस नसलेले लष्कर म्हणून त्यांचे नाव नेहमीच आदराने, घेतले जायचे. मात्र अलीकडच्या काळात लष्करातील अनेक गैरव्यवहार आता उघडकीस येऊ लागले. त्यामुळे आता लष्करीक्षेत्रात देखील भ्रष्टाचाराची पाळेमुळे चांगलीच रोवल्याचे अलीकडच्या काही घटनांनी शिक्कामार्तब केले. जवान तेजबहादूर यांच्या व्हिडिओमुळे, लष्करातील जवानांना निकृृष्ट प्रकारचे अन्न देण्यात येते हे उघडकीस आल्यानंतर काल लष्करभरतीचा पेपर फुटल्याचे समोर आले. प्रथम घटना ही जवानांचे दशा दाखवते, तर दुसरी घटना ही लष्करातील अनागोंदी, आणि भ्रष्टाचाराची लागण किती मोठया प्रमाणात झाली आहे, याचा प्रत्यय येतो. लष्करभरतीचे पेपर फुटलेच कसे? हा महत्वाचा प्रश्न आहे. अर्थात यामध्ये लष्करातील बडया अधिकार्यांचा समावेश असल्याशिवाय अशा घटना घडणार नाहीत. हे काम एकटया दुकटयाचे किंवा भुरटया लोकांचे काम नसून यामागे मोठे रॅकेट असण्याची शक्यता आहे. लष्करभरतीचे पेपर आदल्या दिवशी विद्यार्थ्यांपर्यंत पोहचतातच कसे, आणि आदल्या दिवशी ते पेपर लिहून घेण्यासाठी विद्यार्थ्यांना चक्क एका लॉजवर बोलावून घेण्याची किमया, त्या आरोपींची भ्रष्टाचाराप्रती पोसलेली मानसिकता लक्षात आणून देते. विशेष लक्षात घेण्याजोगी गोष्ट म्हणजे, हे पेपरफुटीचे प्रकरण एकाशहरापुरते मर्यादित नाही. तर यात पुणे, नागपूर, नाशिक, गोवा, ठाणे यासह अनेक शहरांमध्ये पसरलेली ही लिंक आहे. पोलिसांनी आतापर्यंत फक्त 18 आरोपी आणि 350 विद्यार्थ्यांना अटक केली आहे. मात्र अजूनही या घटनेतील मास्टीमाईंड फरार आहेत, त्यांचा सुगावा तपासयंत्रणेला लागलेला नाही. मात्र या मोठया षडयंत्रात लष्करातील अनेक बडे मासे, सिव्हील सोसायटीतील पांढरपेशे सामील असण्याची शक्यता आहे. नागरी समाजात असलेले भ्रष्टाचाराचे लोण आता लष्करातील व्यवस्था पोखरू लागल्याचे एंकदरित चित्र आहे. लष्करासाठी राखीव ठेवलेला निधी अपुरा पडतो, अशी ओरड नेहमीच होते, मात्र तो निधी योग्य कामासाठी, पुर्ण खर्च होतो का? की लष्करातील निधीला देखील आता पाय फुटू लागले आहे, याची तपासणीची वेळ आलेली आहे. लष्करांचे कोणत्याही प्रकारचे ऑडिट होत नाही. लष्करही देशाची अंतर्गत बाब असल्यामुळे तिथे गोपनीयता पाळली जाते. आणि ती पाळायलाच पाहिजे, तिथे कुणाचेही दुमत नाही. मात्र गोपनीयतेच्या नावाखाली भ्रष्टाचाराचा वारू फोफावतोय का? याची नोंद संरक्षणमंत्र्यांनी आतातरी घेतली पाहिजे. लष्करामध्ये झाडाझडती घेऊन, तेथील भ्रष्टाचाराचा वारू वेळीच रोखण्याची गरज आहे. लष्कराला पोखरू पाहणारी कीड ही अतिशय लाच्छंनास्पद, आणि अंतर्गत सुरक्षेला भगदाड पाडणारी आहे. आज पेपरफुटीचे प्रकरण समोर आले, काही दिवसांनी पुन्हा एखादे प्रकरण चर्चेत आले, तर लष्करावरील सर्वसामान्यांची विश्वासार्हता कमी होऊ शकते.