सैन्यभरतीचा पेपर लीक, 18 जणांसह 350 विद्यार्थी अटकेत
ठाणे, दि. 26 - सैन्यभरतीचा पेपर फुटल्याप्रकरणी ठाणे क्राईम ब्रांचने देशभरात मोठी कारवाई केली आहे. पोलिसांनी आतापर्यंत 18 आरोपींसह 350 विद्यार्थ्यांना अटक केली आहे. अटक झालेल्या आरोपींमध्ये सैन्याशी निगडीत काही जणांचा समावेश आहे. ठाणे, पुणे, नागपूर, नाशिक आणि गोव्यात छापे मारुन पोलिसांनी आरोपी आणि विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणावर धरपकड केली आहे. शनिवारी रात्री उशिरा क्राईम ब्रांचने कारवाईला सुरुवात केली असून सकाळपर्यंत छापेमारी सुरु होती. देशभरातील विविध केंद्रांवर सैन्यदलातील भरतीसाठी सकाळी 9 वाजता लेखी परीक्षा होत आहे. मात्र आदल्या दिवशी रात्रीच परीक्षेचा पेपर काही जण लिहित असल्याची माहिती ठाणे पोलिसांना मिळाली होती. हॉटेल आणि लॉजमध्ये विद्यार्थ्यांना गोळा करुन आरोपी त्यांच्याकडून पेपर लिहून घेत होते.