Breaking News

न्यायाच्या प्रतीक्षेची अखेर ! भैयालाल भोतमांगे यांचे निधन


नागपूर, दि.21 : दहा वर्षे उलटून ही न्यायाच्या प्रतीक्षेत असलेल्या खैरलाजी हत्याकांडातील पीडित आणि एकमेव साक्षीदार असलेल्या भैयालाल भोतमांगे यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. ते 62 वर्षांचे होते. अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांची प्रकृती गंभीर असल्याने डॉक्टरांनी त्यांना नागपूरला हलवण्यास सांगितले होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
 खैरलाजी हत्याकांडाचे प्रकरण अद्याप सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. दहा वर्षापूर्वी दलित आणि सवर्णांच्या वादात दलित कुटुंबातील चार जणांची हत्या करण्यात आली होती. भैयालाल भोतमांगे यांची पत्नी आणि तीन मुले अशा चौघांची हत्या झाली होती. भैयालाल भोतमांगे हे शेतावर गेले असल्यामुळे त्यांचा जीव वाचला होता.  या घटनेचे पडसाद विधानसभेसह संसदेतही उमटले होते. या हत्याकांडानंतर तब्बल एक महिन्यानंतर खटला सुरु झाला होता. 15 ऑक्टोबर2008 साली भंडारा सत्र न्यायालयाने 8 जणांना दोषी ठरवले होते. त्यानंतर 2010 साली नागपूर खंडपीठाने 6 आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. सध्या सर्वोच्च न्यायालयात हा खटला सुरु असून आरोपींना फाशी व्हावी, अशी मागणी  भैयालाल भोतमांगे यांनी केली होती. न्यायासाठी त्यांनी 10 वर्षे लढाई दिली. मात्र दुर्दैवाने या प्रकरणाचा निकाल लागण्याआधीच त्यांचे निधन झाले.