वाहनचालकाने वाहन चालविताना वाहतुकीच्या नियमांचे पालन करावे
। उपप्रादेशिक परिवहन अधिकारी वाघमारे यांचे आवाहन
अहमदनगर, दि. 22 - वाहनांना रिफ्लेक्टर नसल्यामुळे रात्रीच्या वेळ समोर वाहन आहे, हे वाहनचालकाच्या लक्षात येत नाही. त्यामुळे प्रसंगी अपघात होण्याची शक्यता असते. त्यासाठी रस्ता सुरक्षा अभियाननिमित्त चारचाकी वाहनांना रिफ्लेक्टर लावण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. यानिमित्त मोठ्या संख्येने वाहनांना रिफ्लेक्टर लावण्यात येणार आहेत. वाहतुकीचे नियम पाळल्यास अपघात टाळता येऊ शकतात. वाहनचालकाने वाहन चालविताना वाहतुकीच्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी वाघमारे यांनी केले.रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत चारचाकी वाहनांना रिफ्लेक्टर लावण्यात आले. यावेळी श्री. वाघमारे बोलत होते. यावेळी भांबरे, अल्ताफ सय्यद, समीर शेख, रमेश भोसले, लुकस पवार, सुधाकर शिरसाठ, जय बोगावत, दिलीप कुलकर्णी, राजू कुलकर्णी, राजू वाघमारे आदींसह नागरिक उपस्थित होते.
भांबरे म्हणाले की, डीएसपी चौक, महानगरपालिका, तारकपूर, भिंगार कॅम्प रोड आदी परिसरातील चारचाकी वाहने, तसेच बैलगाड्या, ट्रॅक्टर, विजेचे खांब यांना रिफ्लेक्टर लावण्यात आली. रात्रीच्या वेळी अपघात होऊ नये, यासाठी डिव्हाडयर असलेल्या ठिकाणीही रिफ्लेक्टर व रेडियम लावण्यात आले.
समीर शेख म्हणाले की, प्रत्येकाने वाहन चालविताना काळजी घेणे आवश्यक आहे. दारू पिऊन कधीही वाहन चालवू नये. वाहतुकीच्या नियमांचे तंतोतंत पालन करावे, असे ते म्हणाले. रमेश भोसले म्हणाले की, रस्ता सुरक्षा अभियानामुळे नागरिकांमध्ये जागृती होत आहे. यानिमित्त अनेक उपक्रम राबविले जात आहेत. जनजागृतीचे काम असेच सुरू राहिल्यास अपघातांचे प्रमाण कमी होईल, असे ते म्हणाले.
