वाहनचालकांत कायदे पाळण्यापेक्षा तोडण्याची मानसिकता जास्त
। उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आर. टी. गिते यांचे प्रतिपादन
अहमदनगर, दि. 22 - कुठलाही प्रवास करताना आधी आपल्या वाहनाचा वायफर, इंडिकेटर, ऑईल, टायर चांगले असले पाहिजे. लांबचा प्रवास असेल, तर लवकर निघा. सावकाश जा व आरामशीर पोहोचा. हे करीत असताना नो एंट्रीचे चिन्ह, धोक्याचे वळण, पुढे गाव आहे अशा चिन्हे रस्त्यावर असतात. त्याकडे दुर्लक्ष करून वाहन चालविल्यास अपघात होतात. त्यासाठी वाहनचालकांनी या चिन्हांकडे लक्ष देऊन वाहन चालवावे. वाहनचालकांत कायदे पाळण्यापेक्षा तोडण्याचीच मानसिकता जास्त असल्याचे दिसून येते असे, प्रतिपादन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आर. टी. गिते यांनी केले.एमआयडीसी येथील इंडियन सीमलेस कंपनीत रस्ता सुरक्षा अभियानानिमित्त कामगारांचे रस्ता सुरक्षेविषयी प्रबोधन करताना गिते बोलत होते. यावेळी आरटीओ अधिकारी वडितके, सौ. केंद्रे, एफ. एस. शेख, तसेच दिलीप कुलकर्णी, कंपनीचे व्यवस्थापक प्रतापकुमार कपूर, चैतन्य शिंदे आदींसह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
गिते पुढे म्हणाले की, वाहतुकीच्या नियमांचे पालन केल्यास संभाव्य अपघात टाळता येऊ शकतात. भारतात दरवर्षी रस्ते अपघातात सुमारे 1.5 लाख लोक मृत्युमुखी पडतात. यात दुचाकीस्वार जास्त आहेत. घाट व चढावरून जाताना ओव्हरटेक करू नये. वर्दळीच्या ठिकाणी आपले वाहन सावकाश चालवावे. दोन वाहनांत सुरक्षित अंतर ठेवले पाहिजे. त्याचबरोबर वाहनचालकाची वागणूक सौजन्याची असायला हवी. वाहन चालविताना ओव्हरटेक करण्यापेक्षा पहिले आप अशी भावना पाहिजे. सौजन्याला संयमाची जोड हवी. रस्त्यामध्ये कुठे अपघातग्रस्त दिसल्यास अपघाताच्या एक तासांत अपघातग्रस्ताला मदत मिळाली, तर त्याचे प्राण वाचू शकतात, असे ते म्हणाले. सूत्रसंचालन कंपनीचे बी. टी. चेमटे यांनी केले, तर आभार प्रतापकुमार कपूर यांनी मानले.
