Breaking News

शहर बस सेवा ताब्यात घेणार नाही ः महापौर

सांगली, दि. 14 - महापालिका शहर बस वाहतूक चालवण्यासाठी ताब्यात घेणार नाही, असे स्पष्टीकरण महापौर हारुण शिकलगार यांनी दिले. गेल्या आठवड्यात  एसटी महामंडळाने महापालिकेला पाच वर्षात झालेला 45 कोटी 33 लाख रुपये तोट्याची रक्कम तातडीने भरा, अन्यथा शहर एसटी सेवा बंद करु, असा इशारा  दिला होता. या पार्श्‍वभूमीवर ते बोलत होते. 
महापालिका क्षेत्रात शहरी वाहतूक सेवा द्यायची जबाबदारी कायद्याने महापालिकेचीच आहे. शहरात 70 गाड्या कार्यरत आहेत. त्यावर दीडशेंवर वाहक - चालक  आहेत. शहर बस वाहतुकीसाठी केंद्राच्या वतीने एसटीला अनुदान दिले जाते. एसटीला शहर बस वाहतूक सुरु ठेवताना कमी भारमानामुळे प्रतिवर्षी आठ ते नऊ  कोटींचा तोटा होतो. ही तोट्याची रक्कम द्यायची जबाबदारी महापालिकेची आहे, असे एसटीचे मत आहे. महामंडळाला दरवर्षी हे सारे कळवण्याचा सोपस्कारही  स्थानिक आगाराला पार पाडावा लागतो. त्यानंतर त्या प्रक्रियेचाच एक भाग म्हणून महामंडळाच्या वतीने महापालिकेला पत्रव्यवहार होतो. महापौरांनी मात्र यावर  शहराची एकूण गरज विचारात घेता ही एसटी सेवा ताब्यात घ्यायचा प्रस्ताव विचाराधीन नसल्याचे स्पष्ट आहे.