Breaking News

मिरजेत पोलीस ठाणे परिसरातील 15 दुकाने फोडली

सांगली, दि. 14 - मिरजेत मध्यरात्रीच्या सुमारास तब्बल 12 दुकाने फोडून चोरट्यांनी एकच धुमाकूळ घातला. 5 दुकानातून सुमारे 35 हजाराची रोकड आणि  इतर साहित्य असा 37 हजार 700 रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेला. लोणीबाजार, तांदूळ मार्केट परिसरात झालेल्या चोरीच्या सत्राने व्यापारी वर्गात नाराजी पसरली  असून पोलिसांच्या कार्यक्षमतेवरच प्रश्‍न निर्माण झाला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, मिरजेच्या लक्ष्मी मार्केट परिसराला लागून लोणी बाजार, तांदूळ मार्केट, गणेश मार्केट परिसर येतो. शहर पोलिस ठाण्यापासून  दोन-अडीच फर्लांगाच्या आतील हा परिसर असून दिवसभर ग्राहकांची, नागरिकांची वर्दळ तेथे असते. रात्री उशिरापर्यंत जाग असणारा हा परिसर आहे.
बुधवारी रात्री 12 वाजल्यापासून मध्यरात्री 3 वाजेदरम्यान चोरट्यांनी एक, दोन नाही तब्बल 12 दुकाने फोडली. चोरांनी अक्षरशः तैमान घातले. दिसेल ते दुकान  फोडायचे सत्रच चालवले.
लोणीबाजारातील हिंदमाता चौकात गणेश शिवाजी तोडकर यांचे दुकान आहे. दुकानाच्या समोरील बाजूस असलेल्या शटरचे कुलूपे तोडून चोरट्यांनी आत प्रवेश  केला. मोबाईल, कात्री, सॅक तसेच 3630 रुपयांची रोकड असा 16 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल लांबवला. शेजारील राजेश मोहनलाल जैन यांच्या मालकीचे  जैन लेडीज शॉप फोडून 4 हजाराची रोख रक्कम लांबवली. जितेंद्र धनदत्त बोरगांवे यांच्या ड्रेसलँड लेडीज वेअर दुकानातून 2 हजार, रेवणी गल्लीतील पटेल  एंपायरमधील जय मल्हार कृषी सेवा केंद्रातून 10 हजाराची रोकड चोरुन नेली. हे दुकान वसंत मालिशा हनगंजे यांचे आहे. गणेश मार्केटातील जैलाब हुसेन मोमीन  यांच्या पूजा स्टॉल नांवाच्या मसाल्याच्या दुकानातून 4 हजार 500 रुपयांची रोकड लांबवली.
दुकाने फोडण्याची पद्धत एकसारखी होती. समोरच्या बाजूला असलेल्या शटरचे, दरवाजाचे कुलूप कटावणीने तोडायचे, शटरची विक्री उचकटायची आणि आत  प्रवेश करायचा. हाताला लागेल तेव्हढी रक्कम गोळा करायची आणि पलायन करायचे अशा तर्‍हेने दुकाने फोडण्यात आली. वरील दुकानातून एकूण 37 हजार 700  रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला.
आणखी सात दुकनांच्या शटरची कुलूपे तोडून चोरट्यांनी हात साफ करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांच्या हाती काही लागले नाही. मुसा रफिक पटवेगार यांचे  फॅशन गारमेंट, प्रमोद गजानन ऐतवडे यांचे पिको फॉलचे दुकान, किरण कृष्णा तोडकर यांचे श्री लक्ष्मी बॅगल्स,  लेडीज वेअर दुकान, प्रकाश दौलतराव चव्हाण  यांचे श्री साई पिको फॉलचे दुकान, ललिता किशोर पोळ यांचे समृद्धी ब्युटी पार्लर, डॉ. शेखर करमरकर यांचे चितळे डेअरी एजन्सी अशी दुकाने चोरट्यांनी  फोडली. तब्बल तीन तास चोरटे दुकाने फोडत होती. रोकड लांबवत होते.
आज सकाळी गणेश तोडकर दुकानाकडे आले तेंव्हा शटरचे कुलूप तोडले असल्याचे दिसले. त्यांना संशय आला. आत जाऊन पाहिले तेंव्हा दुकानातील डेल  कंपनीची सॅक, मोबाईल, कात्री आणि रोकड गायब झाल्याचे दिसले. शेजारील जैन यांचे दुकानही फोडल्याचे दिसून आले. त्यानंतर परिसरातील 12 दुकाने फोडून  रोकड लांबवल्याचे दिसून आले. एक नाही, दोन नाही, तब्बल 12 दुकाने चोरट्यांनी फोडली. या चोरीच्या सत्राने व्यापारी, दुकानदारांमध्ये तीव्र नाराजीचे  वातावरण पसरले आहे. पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्‍न निर्माण झाला आहे.
सलग 12 दुकाने फोडून चोरट्यांनी पोलिसांचेच 12 वाजवले अशी खोचक प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे. मध्यरात्री 12 नंतर 12 दुकाने फोडली. पोलीसांच्या  जागरुकतेचे 12 वाजवले. असा 12 हजाराचा असा आगळा वेगळा योगायोग मिरजेत घडून आला.
एकाच रात्री 12 दुकाने फोडली जाण्याची अलिकडच्या काळातील ही पहिलीच घटना आहे. यापूर्वी इतक्या मोठ्या प्रमाणात दुकाने फोडून चोरी झाल्याचा प्रसंग  मिरजकरांना आठवत नाही. याआधी निदान काही दिवसांचा गॅप असायचा, यावेळी गॅपही भरुन काढला असा उपहासात्मक टोला चर्चेतून लगावला जातो आहे.
लोणीबाजार, तांदूळ मार्केट, गणेश मार्केट परिसरात सलग दुकाने फोडण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर येताच पोलीस चक्रावले. डीवायएसपी धीरज  पाटील, पो. नि. सदाशिव शेलार आदी अधिकार्‍यांनी चोरी झालेल्या ठिकाणांचीपहाणी केली. पोलीस फौजफाटा दाखल झाला. श्‍वानपथक मागवले. विजापूर  वेसेतील मिरची बाजारापर्यंत श्‍वानपथके माग काढला. ठसे तज्ञांनाही पाचारण करण्यात आले. चोरट्यांपर्यंत पोचता येईल असे ठोस काही हाती लागलेले नाही.
चोरट्यांनी व्यवसायाशी इमानदारी ठेवली असावी! एका दुकानाच्या टेबलवर चोरट्यांनी चोरुन घेतलेल्या रक्कमेतील 50 हजाराची नोट ठेवली होती. त्यामागे  चोरट्यांचा उद्देश काय होता हे मात्र समजले नाही.
शहर पोलीस ठाण्यापासून दीड-दोन फर्लांग अंतरावरच्या परिसरात चोर्‍या झाल्या. दुकाने फोडली. शटर उघडतांना, कुलूप तोडतांना कसलाही आवाज कोणालाच  कसा आला नाही असा सवाल चर्चेत आहे. पोलीस रात्री-अपरात्री गस्त घालतात. मार्केट परिसरात 12 दुकाने फोडण्याचा रात्री 12 ते मध्यरात्री 3 वाजेपर्यंत  धुमाकूळ चोरांना घातला. गस्तीवरील पोलीस त्यावेळी काय करत होते ? गस्त खरोखरीच घातली जाते का यावर संशय निर्माण झाला आहे.
गणेश तोडकरचा व्यापार्‍याने चोरीची फिर्याद नोंद केली. त्यांच्या दुकानात सीसीटीव्ही कॅमेरा आहे. तीन चोरटे त्यात दिसतात. त्यांनी चाकू, तलवार अशी हत्त्यारे,  कटावणी बाळगली होती. चोरटे मराठीत बोलत होते. त्यांनी तोंडावर कापड गुंडाळले होते.