Breaking News

ठाणे महापालिकेसाठी काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्र, आघाडीवर शिक्कामोर्तब

ठाणे, दि. 07 - मुंबई महापालिकेत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची युती होऊ शकली नसली, तरी ठाण्यात मात्र हे दोन्ही पक्ष एकत्र आले आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीवर ठाणे महापालिकेसाठी शिक्कामोर्तब झाला आहे. ठाण्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या महत्त्वाच्या नेत्यांमध्ये बैठक झाली. शासकीय विश्रामगृहात गुप्तपणे बैठक पार पडली. यात एकत्रितपणे निवडणूक लढण्याचं ठरलं असल्याची माहिती मिळते आहे. मात्र, जागावाटपावर अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. येत्या 12 जानेवारील काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये आणखी एक बैठक होऊन त्यात जागावाटपावरही अंतिम निर्णयाची शक्यता वर्तवली जाते आहे.
आजच्या बैठकीला राष्ट्रवादीचे नेते आनंद परांजपे, संजीव नाईक, काँग्रेस शहराध्यक्ष मनोज शिंदे इत्यादी ठाण्यातील दोन्ही पक्षांचे महत्त्वाचे नेते आणि पदाधिकारी उपस्थित होते. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या आदेशनंतर ठाण्यातील नेत्यांनी या बैठकीचं आयोजन केलं होतं. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या बैठकीत ठाणे महापालिकेत एकत्र लढण्याच्या विचारावर पूर्णपणे सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती काँग्रेसचे ठाणे शहराध्यक्ष मनोज शिंदे यांनी एबीपी माझाशी बोलताना दिली. शिवसेना-भाजपचं ठाण्यात अद्याप काहीही निश्‍चित नसताना काँग्रेस-राष्ट्रवादीने आघाडी करत एकत्र लढण्याच्या दृष्टीने पावलं टाकली आहेत. त्यामुळे ठाणे महापालिका निवडणुकीत ‘काँटे की टक्कर’ होणार एवढं निश्‍चित.