रशिया, इराण व तुर्कस्तान सीरियातील युद्धबंदीसाठी एकत्र येणार
अंकारा, दि. 25 - रशिया, इराण व तुर्कस्तान सीरियातील युद्धबंदीसाठी त्रिस्तरीय समिती स्थापन करणार असल्याचे मंगळवारी जाहीर करण्यात आले. या देशांनी सीरियातील विरोधी पक्षांना जिनेव्हा शांतता चर्चेत सहभागी होण्याची विनंती केली आहे. इराण, तुर्कस्तान व रशियाच्या प्रतिनिधीमंडळ अस्तानामध्ये 23 व 24 जानेवारी रोजी सीरिया सरकार व विरोधी पक्षादरम्यान सुरू झालेल्या चर्चेचे समर्थन करत आहे, असे यावेळी प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्रकात म्हटले आहे. केवळ राजकीय प्रक्रियेच्या सहाय्यानेच सीरियातील समस्या सोडवता येऊ शकते. त्यावर काही लष्करी उपाय असू शकत नाहीत, यावर हे देश सहमत आहेत. इसिस विरोधात संयुक्त कारवाई करण्यावरही या देशांचे एकमत झाले आहे.
