Breaking News

मुलींच्या अब्रूपेक्षा मत महत्वाचे - शरद यादव

पाटणा, दि. 25 - मुलींच्या अब्रूपेक्षा मताला जास्त किंमत असल्याचे वादग्रस्त वक्तव्य संयुक्त जनता दलाचे अध्यक्ष शरद यादव यांनी केले आहे . पैशाच्या आधारे होणार्‍या मताच्या विक्रीबाबत त्यांनी खंत व्यक्त केली. कर्पुरीलाल ठाकूर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.
 मुलीच्या अब्रूपेक्षा मताची किंमत जास्त महत्त्वाची आहे. एकदा मुलीची अब्रू गेली की, तिची बदनामी गाव किंवा जास्तीत जास्त जिल्हा पातळीपर्यंत होईल. मात्र एकदा मत विकले गेले तर संपूर्ण देशाची अब्रू जाईल. तुमचे स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही, असे ते म्हणाले. पैशा अभावी आमचा पक्ष उत्तर प्रदेशात विधानसभा  निवडणूक लढवण्यास  असमर्थ ठरत असल्याबाबत त्यांनी चिंता व्यक्त केली. राजकारणात पैशाला  अधिक महत्व आहे, हे सांगताना त्यांनी दक्षिणेतील राज्यांचे उदाहरण दिले.
मी गेली अनेक वर्षे या पक्षाचे नेतृत्व केले आहे. परंतु पैशाअभावी  निवडणूक लढवता येत नाही, अशी वेळ यापूर्वी कधीच आली नाही. सध्या मतांसाठी उघडपणे  आर्थिक व्यवहार केला जातो. दक्षिणेकडील राज्यांमध्ये  खासदार बनण्यासाठी 25 ते 30 कोटी तर आमदार बनण्यासाठी 5 ते 10 कोटी रुपये खर्च होतात, असे त्यांनी सांगितले.