Breaking News

महाविद्यालयीन नवमतदार हा लोकशाही निवडणूकांमधील बदलांचा अग्रदूत - जे.एस. सहारीया

नाशिक, दि. 14 - लोकशाही बळकट होण्यासाठी मतदारांमध्ये जागरुकता येणे गरजेचे आहे. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमधील नवमतदार हे यासाठी होत  असलेल्या बदलांचे अग्रदूत असून ते या प्रक्रियेमध्ये मोठ्या संख्येने सहभागी  होतील, अशी अपेक्षा राज्य निवडणूक आयुक्त जे.एस.सहारिया यांनी आज व्यक्त  केली.
राज्यात होत असलेल्या महानगरपालिका, जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणूकांच्या पार्श्‍वभूमीवर श्री. सहारिया यांनी महाविद्यालयीन  विद्यार्थ्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सींगद्वारे संवाद साधला. याप्रसंगी राज्य निवडणूक आयोगाचे सचिव शेखर चन्ने, विभागीय आयुक्त एकनाथ डवले, विषेश पोलिस  महानिरीक्षक विनय चौबे, जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी., महानगर पलिका आयुक्त अभिषेक कृष्णा, पोलिस आयुक्त रवींद्र सिंगल, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त  विद्यापीठाचे कुलसचिव दिनेश भोंडे आदी उपस्थित होते.
निवडणूक प्रक्रियेमध्ये विविध सुधारणा होत आहेत यासाठी सर्वांचाच सहभाग अपेक्षित आहे असे सांगताना श्री .सहारिया यांनी निवडणूकांमध्ये मोठ्या प्रमाणात  मतदानासाठी प्रयत्न होण्याची गरज व्यक्त केली. यासाठी प्रत्येक विद्यापीठ तसेच महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी आपल्याबरोबरच आजूबाजूच्या परिसरातील  लोकांमध्ये मतदानातील जबाबदारी बद्दल जागरुकता निर्माण करावी आणि त्यांना मतदान प्रक्रीयेत सहभागसाठी प्रवृत्त करावे, असे त्यांनी सांगीतले, असेही ते  म्हणाले.
मुंबई विद्यापीठाने या नवमतदारांना प्रक्रियेत सहभागी करुन घेण्यासाठी उपाययोजना राबवतांना प्रवेश देतानाच त्यांच्या मतदार नोंदणीचे बंधन घातले आहे. असे  कल्पक उपाय सर्वांनी योजल्याशिवाय बळकट लोकशाहीचा उद्देश साध्य होणार नाही. निवडणूकांमध्ये मतदारांना निर्भय वातावरणात मतदान करता यावे यासाठी  प्रशासकीय यंत्रणा विविध पद्धतीने काम करत असते. निवडणूकीमधून कोणतेही गुन्हेगारी पार्श्‍वभूमी नसलेल्या योग्य  उमेदवारांची निवड व्हावी अशी अपेक्षा व्यक्त  केली जाते. त्यासाठी निवडणूक यंत्रणेकडून नागरीकांच्या मोठ्या अपेक्षा आहेत. पण यंत्रणेला कायदे व नियमांमध्ये राहून काम करावे लागते. कोणताही दबाव व  प्रलोभनांना बळी न पडता नागरीकांनी जागरुक राहून निवडणूकीतील गैरप्रकारांविरोधात तक्रारी करण्यासाठी पुढे यावे, असे आवाहनही श्री.सहारिया यांनी केले.
नुकत्याच झालेल्या नगर परिषद निवडणूकांमध्ये गैरप्रकारांना आळा घालतांना निवडणूका कालावधीत 200 गुन्हेगार प्रवृतीच्या व्यक्तींना तडीपार करणे, 26 कोटी  रुपयांची बेहिशेबी रक्कम हस्तगत करणे आणि 10 को.रु. किमतीचे मद्य जप्त करण्याची कार्यवाही करण्यात आली असल्याची माहिती त्यांनी दिली.
यावेळी श्री. सहारिया आणि श्री. चन्ने यांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्‍न  व शंकाना दिलखुलास उत्तरे दिली. श्री.चन्ने यांनी आदर्श आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी  करणेसाठी खर्चावर नियंत्रण ठेवणे, आर्थिक बळाचा दुरुपयोग टाळणे व प्रलोभनाला आळा घालण्यासाठी पोलिस व प्रशासन करत असलेल्या प्रयत्नांची माहिती  दिली. निवडणुकांसाठी स्टॅटिक सर्व्हिलन्स टिम, फ्लाईंग स्कॉड  आदी माध्यमातून उपाययोजना निवडणूकांमधील सुधारणा, तंत्रज्ञानातील बदल याची माहिती  त्यांनी दिली.
याप्रसंगी मुक्त विद्यापीठाच्या दृक श्राव्य केंद्रांतील स्टूडीओमधून श्री.सहारिया यांनी संवाद साधला. विद्यापीठ कार्यक्षेत्रातील विविध जिल्ह्यातील 65  महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांना आयुक्तांशी व्हिडीओ कॉन्फरन्सींगद्वारे संवाद साधण्यासाठी आमंत्रित करण्यात आले होते.
याप्रसंगी नाशिक विभागातील निवडणूक होणार्‍या सर्व जिल्ह्यातील जिल्हाधिकारी , मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा पोलिस अधिक्षक आणि महानगरपालिका  आयुक्त उपस्थित होते.