Breaking News

शिवसेनेच्या बोटाला धरुन भाजपा मोठी झाली हे विसरु नये

पांगरमल येथे शिवसेना शाखेचे उद्घाटन संपन्न

अहमदनगर, दि. 23 - स्व.बाळासाहेब ठाकरे यांनी 1966 साली शिवसेनेची स्थापना केली तेव्हा पासून 80 टक्के समाजकारण व 20 टक्के राजकारण अशी  चळवळ सुरु केली. ती आजपर्यंत सर्व शिवसैनिकांनी चालूच ठेवली आहे. शिवसेनेच्या बोटाला धरुनच भारतीय जनता पार्टी मोठी झाली हे विसरु नये, असे  प्रतिपादन शिवसेना जिल्हाप्रमुख प्रा.शशिकांत गाडे यांनी केले.
नगर तालुक्यातील पांगरमल येथे शिवसेना शाखा स्थापन झाली, त्याचे उद्घाटन प्रा.गाडे यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी सेनेचे संपर्क  प्रमुख श्री.मोहिलेे होते. कार्यक्रमास उपजिल्हाप्रमुख भगवान फुलसौंदर, दिगंबर ढवण,  शहरप्रमुख दिलीप सातपुते, सभागृहनेते अनिल शिंदे,  युवा नेते अमोल  जाधव, पांगरमलचे माजी सरपंच व उपजिल्हाप्रमुख भिमराज आव्हाड, गावातील तरुण कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रा.गाडे पुढे म्हणाले, शिवसेना हा असा एकच पक्ष आहे की त्याचा भगवा झेंडा हा सर्वांच्या हातात आहे. हा भगवा झेंडा संत, हिंदूंचे रक्षण करण्याचे प्रतिक आहे.  या भगव्याला कधी खाली मान घालावी लागणार नाही, असेच काम शिवसेनिकांनी करावे. सत्तेत असताना देखील सर्वसामान्य, शेतकरी कामगारांच्या प्रश्‍नांवर  शिवसेना कायम आक्रमक राहिली सत्तेपेक्षा जनतेचे प्रश्‍न आम्हाला महत्वाचे वाटतात ते सोडविण्यासाठी उद्धव ठाकरे भाजपाशी भांडतात. या कारणावरुन 25  वर्षांपासूनची युती भाजपाने तोडली, पण ते हे विसरले की याच सेनेच्या बोटाला धरुन आपण मोठे झालो. पंतप्रधान मोदींवर प्रा.गाडे यांनी टिका केली. त्यांच्या  भाषणामधील काही मुद्दे खोडून काढीत नोटाबंदीमुळे  शेतकर्‍यांचे, सर्व सामान्यांचे, मजुरांचे हाल झाले. कॅशलेस व व्याजमाफीचा मुद्दा पुढे करुन मोदी सरकार  सर्वांचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करत असल्याचे ते म्हणाले.
यावेळी अनिल शिंदे, दिलीप सातपुते, दिगंबर ठवण, भगवान फुलसौंदर, अमोल जाधव, प्रकाश कुलट यांची भाषणे झाली. अध्यक्षीय भाषणात  संपर्कप्रमुख श्री.मोहिले यांनी शिवसेना हा पक्ष तळागाळातील लोकांच्या मागे उभा आहे. खेड्यापाड्यात उद्घाटनाला शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित  असल्याचे पाहून बाळासाहेबांचा ते किती आदर करतात हे सिद्ध होते. पांगरमल येथील शेकडो तरुणांनी शिवसेनेते प्रवेश केला. या सर्वांचा प्रा.गाडे यांचे हस्ते  सत्कार करुन स्वागत करण्यात आले.
प्रास्तविकात उपजिल्हाप्रमुख भिमराज आव्हाड म्हणाले, मी 30 वर्षांपासून अंतकरणातून शिवसेनेचेच काम करीत होतो. सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून सेनेतच  होतो, आज माझे काम पाहून एका कार्यकर्त्यांवर उपजिल्हाप्रमुख पदाची जी जबाबदारी दिली ती चांगली पार पाडू. येत्या जि.प. व पं.स.निवडणूकीत पांगरमल  गावातून 80 टक्के मतदान सेनेलाच करुन दाखवू असे सांगितले.  सध्याचे लोकप्रतिनिधी फक्त खोटी  आश्‍वासने देत फिरत असून, मोठा विकास केल्याचा आव  दाखवितात. आपण पांढरीपूल एमआयडीसीचा प्रश्‍न मार्गी लावून तरुणांच्या बेरोजगारीचा प्रश्‍न शिवसेनेच्या माध्यमातून सोडवू, असे भिमराज आव्हाड यांनी शेवटी  सांगितले.
या उद्घाटनप्रसंगी शाखाप्रमुख नवनाथ आव्हाड, उपशाखाप्रमुख अमोल आव्हाड, सचिव सोमनाथ आव्हाड, किरण आव्हाड, बापूसाहेब आव्हाड, संतोष आव्हाड,  महादेव आव्हाड, सुदाम आव्हाड, वैभव आव्हाड, विष्णू आव्हाड, शिवाजी आव्हाड, सरपंच बापूसाहेब आव्हाड, पोपट सांगळे, संकेत बडे, आंजाबापू आव्हाड, इदर  आव्हाड, तुकाराम आव्हाड आदिंसह तरुण कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.सूत्रसंचालन प्रकाश कुलट यांनी केले तर भिमराज आव्हाड यांनी आभार  मानले.