Breaking News

दुहेरी खून प्रकरणातील मुख्य सूत्रधार जेरबंद

पुणे, दि. 25 - जेजुरी पोलीस स्टेशनच्या अंतर्गत रीसे (ता.पुरंदर )गावच्या हद्दीमध्ये घडलेल्या दुहेरी खून प्रकरणातील मुख्य सूत्रधार अंकुश ज्ञानेश्‍वर भोंडवे वय  -36 रा.आळंदी -म्हातोबाची यास मंगळवारी (दि.24 )पहाटेच्या सुमारास सापळा रचून जेरबंद केले.अंकुश भोंडवे हा दोन दिवसांपासून पोलिसांना हुलकावण्या  देत होता,मात्र थेऊर येथील आपल्या दुसर्‍या पत्नीला भेटून तो आळंदी म्हातोबाची येथे येणार असल्याची खबर पोलिसांना मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक  रामदास वाकोडे यांचे मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक श्रीकांत देव, पोलीस हवालदार शिवा खोकले, आप्पा पड्याळ, महेश उगले, रणजीत निगडे, अक्षय यादव  आदींनी सापळा रचून त्याला अटक केली.
या घटनेची सविस्तर हकीकत अशी की 21 जानेवारी रोजी सायंकाळी 5 वाजण्याचे सुमारास रिसे गावच्या हद्दीतील गट न.242 मधील ज्वारीच्या शेतामध्ये दोन  अनोळखी पुरुषांचे मृतदेह आढळून आले होते.गळा आवळून व डोक्यात दगड घालून व मारहाण करून दोघांचीही हत्या केल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत होते. हत्या  झालेल्या इसमांचा पोलिसांनी तपास केला असता एक मृतदेह अनिल ज्ञानदेव शिवरकर वय -40 रा. आळंदी म्हातोबाची, तर दुसरा मृतदेह मनोज उर्फ संतोष  शिवाजी जगताप वय 38 रा.लोणीकाळभोर याचा असल्याचे स्पष्ट झाले.शनिवारी (दि.22 )पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक मोहमद सुवेज हक, बारामती विभागाचे  अतिरिक्त अधीक्षक तानाजी चिखले, गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक राम जाधव यांनी घटनास्थळी भेट देऊन  परिस्थितीची पाहणी करीत तपासाच्या  सूचना आणि मार्गदर्शन केले होते. या खून प्रकरणातील आरोपी संतोष कुमावत यास गुन्हे अन्वेषण विभागाच्या मदतीने बंडगार्डन पोलिसांनी रविवारी (दि.22  )जेरबंद केले होते तर मुख्य सूत्रधार अंकुश भोंडवे हुलकावण्या देत होता. अखेर त्याच्याही मुसक्या आवळण्यात जेजुरी पोलिसांना यश आले अंकुश भोंडवे याचेवर  हडपसर, सासवड, हवेली, जेजुरी आदी पोलीस ठाण्यात जबरी चोरीचे गुन्हे दाखल असून लोणीकाळभोर येथे खुनाचा गुन्हा दाखल आहे या भागात त्याची प्रचंड  दहशत असल्याचे पोलीस सूत्रांकडून समजते. त्याला पकडण्यात गुन्हे अन्वेषण शाखेचे कर्मचारी, महेश गायकवाड, बाळासाहेब सकाटे यांनी मोलाची कामगिरी  बजावली.