घरकुल वाटपावरुन काँग्रेसमध्ये दोन गट
सांगली, दि. 25 - मिरजेतील इंदिरानगर घरकुलांच्या वाटपावरुन सत्ताधारी काँग्रेसमध्ये दोन गट पडले आहेत. भाजपी संधान साधलेल्या एका ज्येष्ठ नगरसेवकाने या घरकुलांचे वाटप मुख्यमंत्र्यांच्याहस्ते व्हावे, यासाठ फिल्डींग लावली आहे. याची कुणकुण लागताच त्या नगरसेवकाच्या विरोधातील गटाने काँग्रेस व राष्ट्रवादी नेत्यांच्याहस्ते घरकुल वाटपाचा कार्यक्रम घेण्यासाठी हालचाली सुरु केल्या आहेत. या प्रश्नावरुन काँग्रेस, राष्ट्रवादी व उपमहापौर गट एकत्र आल्याचे चित्रही दिसत आहे. केंद्र शासनाच्या एकात्मिक घरकुल योजनेतून महापालिका क्षेत्र झोपडपट्टीमुक्त करण्यासाठी 98 कोटीचा निधी मंजूर झाला होता. केंद्रातील तत्कालीन काँग्रेस सरकारने या प्रकल्पाला मंजुरी दिली होती, तर महापालिकेत राष्ट्रवादीचे नेते आमदार जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखालील विकास महाआघाडी सत्तेवर होती. या योजनेतून मिरज येथील इंदिरानर, मालगाववेस, दिंडीवेस आदी परिसरातील झोपडपट्टी धारकांचे पुनर्वसन करण्यासाठी प्रभाग क्रमांक 9 मध्ये इंदिरानगर येथे 806 घरकुलांचे काम गेल्या चार ते पाच वर्षापासून सुरु होते. आता या घरकुलांचे काम पूर्ण झाले आहे.
