Breaking News

येत्या दोन दिवसांत जलिकट्टूचे आयोजन केले जाईल - ओ. पन्नीरसेल्वम

नवी दिल्ली, दि. 20 - येत्या दोन दिवसांत जलिकट्टूचे आयोजन केले जाईल. त्यामुळे आंदोलकांनी आपले आंदोलन तातडीने मागे घ्यावे, असे आवाहन तामिळनाडूचे मुख्यमंत्री ओ. पन्नीरसेल्वम यांनी नागरिकांना केले आहे.
जलिकट्टूवर तामिळनाडू सरकार अध्यादेश आणणार असून त्याचा प्रस्ताव केंद्रीय गृह मंत्रालयाकडे पाठवण्यात आला आहे. त्यानंतर गृह मंत्रालयाकडून तो प्रस्ताव राष्ट्रपतींकडे पाठवला जाईल. त्यांनी परवानगी दिल्यानंतर त्यावर राज्यपालांची मंजुरी आवश्यक आहे. यातून सर्वोच्च न्यायालयाकडून देण्यात आलेली स्थगिती उठवण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे समजते.
जलिकट्टूवरील बंदी विरोधात तामिळनाडूमधील शाळा आजही बंद ठेवण्यात आल्या असून जलिकट्टूच्या समर्थनार्थ द्रमुक नेते व खासदार कनिमोझी चेन्नई एगमोर रेल्वे स्टेशनवर ’रेल रोको’ आंदोलन करणार असल्याचे समजते. जलिकट्टूच्या वादातून आज तामिळनाडू बंदचे आवाहन करण्यात आले असून दुस-या राज्यांतही यासाठीची निदर्शने सुरू आहेत.