सांगली जिल्हा परिषद निवडणुकीत पतंगराव, जयंत पाटील यांची सत्वपरीक्षा
सांगली, दि. 29 - सांगली जिल्हा परिषदेच्या आजवरच्या राजकीय बळावर कटाक्ष टाकला असता काँग्रेसचे निर्विवाद वर्चस्व दिसून येते. काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसनेही काँग्रेसची मध्यंतरी दमछाक केली होती. परंतु आता राज्यातील सत्ता बदलानंतर काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्हीही पक्षाची स्थिती काहीशी दोलायमान झाली आहे. भारतीय जनता पक्ष- शिवसेनेची सांगली जिल्ह्यावर पकड नसतानाही या दोन्हीही पक्षांना आता आघाडी करावी असे वाटू लागले आहे. यातच सगळे काही आले. यंदाची ही निवडणूक काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस नेत्यांची सत्वपरिक्षा करणारी ठरणार आहे.
जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचे बिगुल वाजले व आता उमेदवारी दाखल करण्याची वेळ आली तरीही सध्याच्या सत्ताधारी असलेल्या काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जशी आघाडी अद्यापही होऊ शकलेली नाही, तशीच अवस्था भाजप- शिवसेनेची झाली आहे. जिल्ह्यावर पकड मिळविण्यासाठी काँग्रेसचे नेते माजी मंत्री तथा आमदार डॉ. पतंगराव कदम, त्यांचे बंधू आमदार मोहनराव कदम, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभेतील गटनेते आमदार जयंत पाटील हे इच्छुक आहेत. गेल्या पाच- दहा वर्षात जयंत पाटील व माजी गृहमंत्री कै. आर. आर. पाटील यांनी काँग्रेसमध्ये फूट पाडून आपले वर्चस्व प्रस्थापित केले होते. त्यावेळी काँग्रेसला एक पाऊल मागे जाऊन या दोन्हीही नेत्यांशी हातमिळवणी करून सत्ता आपल्या कब्जात आणावी लागली होती.
गत दहा वर्षात कृष्णेच्या पुलाखालून बरेचसे पाणी वाहून गेल्याने राजकीय परिस्थितीत आमुलाग्र बदल झाला आहे. आर. आर. पाटील यांच्या निधनानंतर तासगाव, कवठेमहांकाळ, खानापूर, आटपाडी या मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व कमी झाले आहे,तर जयंत पाटील यांच्या वर्चस्वाखालील वाळवा व मिरज तालुक्यातही त्यांची राजकीय स्थिती काहीशी क्षीण झाली आहे. त्यामुळेच राष्ट्रवादी काँग्रेसला खूप मर्यादा आल्या आहेत, तर दुसरीकडे डॉ. पतंगराव कदम यांनी आपल्या ताब्यातील पलूस, कडेगाव व जत तालुक्यात आपली राजकीय शक्ती कायम ठेवली आहे. याबरोबरच लोकसभा निवडणुकीत सांगली मतदारसंघात प्रथमच भाजपचे संजय पाटील विजयी झाल्याने राजकीय समिकरणे बदलली गेली आहेत. हे लक्षात घेऊनच आजपर्यंत आघाडीच्या राजकारणात टोकाची भूमिका घेणारे जयंत पाटील मवाळ भूमिका घेत काँग्रेसशी आघाडी करण्यासाठी इच्छुक बनले आहेत.
अडीच वर्षापूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीवेळी शिराळा, सांगली, मिरज, खानापूर- आटपाडी, जत या विधानसभा मतदारसंघावर भाजप- शिवसेनेने झेंडा रोवल्याने कागदावरील परिस्थितीत भाजपची ताकद वाढली असली तरी निवडून आलेल्या भाजपच्या चार व शिवसेनेच्या एका आमदारापैकी सांगलीच्या सुधीर गाडगीळ यांचा अपवाद वगळता उर्वरित चारही आमदार पूर्वाश्रमीचे काँग्रेस अथवा राष्ट्रवादी काँग्रेसचेच होते. या चारही जणांना विजयी करण्यासाठी जयंत पाटील यांनी राजकीय पाठबळ दिल्याचे बोलले जात आहे. त्यावेळी त्यांचा उद्देश हा केवळ काँग्रेसलाच रोखण्याचा होता. परंतु आता राज्यातही भाजपची सत्ता आल्याने जयंत पाटील यांची अवस्था ना घर का ना घाटका अशी झाली आहे. कोणत्याही परिस्थितीत सांगली जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकविण्यासाठी काँग्रेससमवेत आघाडी करून सत्ता अबाधित राखण्याचा जयंत पाटील यांचा प्रयत्न आहे. त्यांच्या या प्रयत्नाला कदम बंधू कसा प्रतिसाद देतात, यावरच जिल्हा परिषदेचे संख्याबळ ठरणार आहे.
जिल्हा परिषदेच्या सन 2007 च्या निवडणुकीत 62 पैकी काँग्रेसने 29, तर राष्ट्रवादी काँग्रेसनेही 29 जागांवर विजय मिळविला होता. त्यानंतर सन 2012 च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने एकतर्फी विजय मिळवित 63 पैकी 33 जागा जिंकल्या होत्या. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन बंडखोर सदस्यही विजयी झाले होते. त्यावेळी कदम बंधूंना जिल्हा परिषदेतून हद्दपार करण्यात जयंत पाटील यांनी यश मिळविले होते. त्याचा रागही अद्याप कदम बंधूंच्यात जाणवत आहे. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत ते जयंत पाटील यांना कसा प्रतिसाद देतात? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. जिल्हा परिषदेवर ताबा मिळविल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने सांगली जिल्ह्यात आक्रमक भूमिका घेत काँग्रेस नेत्यांना नामोहरम करण्याची एकही संधी सोडली नव्हती.
देशात मोदींची लाट आली अन नंतर राज्यात नरेंद्र- देवेंद्र लाटेनेही सत्तेची कूस बदलली गेली. सांगली जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक दिग्गज नेते प्रवाहाबरोबर गेल्याने राष्ट्रवादी काँग्रेस कमकुवत बनली. विद्यमान खासदार संजय पाटील यांच्याबरोबर अजित घोरपडे, विलासराव जगताप, शिवाजीराव नाईक, पृथ्वीराज देशमुख यांनी भाजपचा भगवा खांद्यावर घेतल्याने जिल्हा परिषदेत प्रथमच भाजपची उपस्थिती सर्वांनाच जाणवू लागली. याबरोबरच जिल्ह्यातील ग्रामीण भागात स्वाभिमानी शेतकरी संघटनेची ताकदही लक्षात घेता काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसपुढे तगडे आव्हान उभे ठाकू शकते. भाजपकडे ग्रामीण भागातील नेत्यांची एक मोठी फौज प्रथमच या निवडणुकीच्या रणांगणात उतरणार असल्याने आजपर्यंत भाजपचे अस्तित्व हे जिल्हा परिषदेत कधीही नव्हते, ते यंदाच्या निवडणुकीत दिसून येणार आहे. त्यामुळेच ही निवडणूक प्रथमच उत्कंठतेची ठरणार आहे. ग्रामीण भागात भाजप कार्यकर्त्यांचे जाळे नव्हते. परंतु आता भाजपची ताकद ही दिसून येत असल्याने काँग्रेसलाही राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घेऊन आघाडी करणे क्रमप्राप्त ठरणार आहे.
शिवसेनेची ताकदही या जिल्ह्यात नगण्य अशीच होती. सन 2007 च्या निवडणुकीत केवळ 1.3 टक्के, तर सन 2012 च्या निवडणुकीत 1.58 टक्के मते शिवसेनेला मिळाली होती. परंतु खानापूर- आटपाडी या ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे अनिल बाबर विजयी झाल्याने या मतदारसंघात शिवसेनेची चांगली ताकद उभी राहिली आहे. मिरज तालुक्यात माजी खासदार हिंदकेसरी मारूती माने यांचे पुतणे भीमराव माने शिवसेनेत दाखल झाल्याने या तालुक्यातही शिवसेनेची ताकद दुर्लक्षित करून चालणार नाही.