Breaking News

काँग्रेसशी विचारांची, तर शिवसेनेशी आचारांची लढाई - मुख्यमंत्री

मुंबई, दि. 29 - शिवसेना आणि भाजप हिंदुत्वाच्या मुद्यावर एकत्र आली होती. मात्र पारदर्शकता आणि प्रामाणिकतेच्या मुद्यावर शिवसेनेच्या आचारात फरक झाला. शिवसेनेने युती तोडली याचे आम्हाला दु:ख नाही. ते आमचे विरोधक कधीच नव्हते आणि पुढेही नसणार. आमचे मूळ विरोधक काँग्रेसच राहील. त्यामुळे काँग्रेसशी विचारांची, तर शिवसेनेशी आचारांची लढाई आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज स्पष्ट केले. गोरेगाव येथे झालेल्याॠविजयी संकल्प मेळाव्या’त ते बोलत होते.
शिवसेनेशी पारदर्शकतेच्या मुद्यावर काडीमोड होऊन 25 वर्षांची शिवसेना-भाजपची युती तुटल्यानंतर भाजपची आणि विशेषत: मुख्यमंत्र्यांची भूमिका काय असणार, याकडे मुंबईसह राज्यातील जनतेचे लक्ष लागून राहिले होते. मुख्यमंत्री म्हणाले की, लोकसभेतील अभूतपूर्व विजयानंतरही विधानसभेत जुन्या निकषांनुसारच युती करण्याच्या मुद्यावर भाजपने शिवसेनेशी तडजोड करण्याची तयारी दर्शवली होती, मात्रशिवसेनेने आम्हाला वाढलेल्या ताकदीनुसार जागा सोडण्यास नकार दिला. म्हणून आम्हाला युती तोडण्याचा कटू निर्णय घ्यावा लागला. त्यावेळी युती तुटल्यामुळेच मी आज मुख्यमंत्री होऊ शकलो. या 25 वर्षांत काळात शिवसेना सडल्याची भावना उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली. मात्र या काळात मुंबई महापालिकेसह नागरिकांच्या नुकसानाची जबाबदारी कोण घेणार, एकीकडे गगनचुंबी इमारती उभ्या रहात असतांना झोपडपट्टीत पाणी व वीज देऊ शकलो नाही, सर्वसामान्यांना परवडणा-या भावात घरे देऊ शकलो नाही याची जबाबदारी कोणाची हेही एकदा स्पष्ट झाले पाहिजे. सामान्य मुंबईकरांमध्ये काय बदल झाला याचाही विचार होण्याची आवश्यकता असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
विकास व पारदर्शकतेच्या मुद्यावर आता महापालिका निवडणुकीचा अजेंडा असणार आहे. जर कौरव-पांडव हा मुद्दा समोर आलाच असेल, तर धर्मयुद्ध करू. या धर्मयुद्धात कोण समोर हे पहायचे नसते. केवळ सत्याची बाजू काय आहे हे पहायचे असते. शिवाजी महाराजांचे नाव घेऊन चालणा-यांना शिवरायांप्रमाणे पारदर्शकता व प्रामाणिकता मान्य नाही. ॠकरून दाखवले’ व ॠडीड यु नो’ असे काही जणांना सांगावे लागते. मात्र भाजप जमिनीवर राहून काम करून दाखवते. आम्ही ॠकरून दाखवले’ असे सांगत नाही. करून दाखवले हे कुणीही सांगेल. पण भाजपने केलेल्या कामांचे कौतुक जनताच करते, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रूपाने देशभरातील जनतेला आशेचे किरण दिसून आले. त्यामुळे भाजपच महाराष्ट्रात बदल घडवू शकते, असा विश्‍वास वाटल्याने विधानसभा निवडणुकीत जनतेने भाजपला कौल देत क्रमांक एकचा पक्ष म्हणून निवडून दिले. हा जनतेचा विश्‍वास आम्ही सार्थ करून दाखवू. पंतप्रधानांच्या पावलावर पाऊल टाकत पारदर्शकता व प्रामाणिकतेच्या मुद्यावरच महापालिका निवडणुकांना आम्ही सामोरे जाणार आहोत. देशात व राज्यात परिवर्तन घडवण्याचा संकल्प मोदी सरकारने केला आहे. त्यामुळे जे येतील त्यांच्यासह, जे येणार नाहीत त्यांच्याशिवाय परिवर्तन हे होणारच, असे सांगत ॠसूरज उगेगा, कमल खिलेगा, परिवर्तन समय की मांग है, तो परिवर्तन होकर रहेगा’, असा दृढविश्‍वासही फडणवीस यांनी व्यक्त केला.
मुख्यंत्र्यांच्या जोरकस भाषणामुळे उपस्थित कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य निर्माण झाले. या वेळी मुंबई भाजपचे अध्यक्ष आमदार आशिष शेलार, शिक्षण मंत्री विनोद तावडे, गृहनिर्माण मंत्री, खा. पूनम महाजन, खा. गोपाळ शेट्टी, आ. अतुल भातखळकर, आ. पराग आळवणी आदी मान्यवर उपस्थित होते.