Breaking News

रहिमतपूर येथील बाजारात देशभरातून घोडी दाखल

रहिमतपूर, दि. 29 (प्रतिनिधी) कोरेगाव तालुक्यातील रहिमतपर नगरपरिषदेच्यावतीने अश्‍वपालक, अश्‍वशौकीनांसाठी घोड्यांच्या बाजाराचे आयोजन करण्यात  येते. 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनी ह्या बाजाराचे उद्घाटन केले जाते. लग्नकार्य, हौशेसाठी तसेच छंद म्हणून पाळणार्‍या अश्‍वप्रेमीसाठी हा बाजार आयोजित  केला जातो. रहिमतपूर या गावाला ऐतिहासिक पार्श्‍वभूमी असल्याने पूर्वीच्या काळात रहिमतपुरमध्ये घोड्यावरुन बाजार भरत असल्याचे जाणकार सांगतात.
मारवाडी, पंजाबी जातीच्या घोड्यांची बाजारात शेकडो घोडी असल्याने, अश्‍वपालक आणि अश्‍वप्रेमींसाठी व्यवहारास सुरुवात झाल्याचे समजते. उत्तर प्रदेश,  राजस्थान, पंजाब येथील व्यापारी रहिमतपुर येथे अश्‍वासह डेरेदाखल झाले आहेत. घोड्यांच्या देखणेपणा आणि शरीरावर असणार्‍या लक्षणे बघून खरेदी विक्रीचे  व्यवहार चालत आहेत. नगरपालिकेतर्फे वीज, पाणी, राहण्याची सुविधा दिल्या आहेत. विविध प्रकारचे घोडे पाहण्यासाठी अबालवृध्द बाजार पाहण्यासाठी येत  आहेत. नगराध्यक्ष आनंदा कोरे म्हणाले, परराज्यातील व्यापारी रहिमतपूरमध्ये आल्याने त्यांना सोयी सुविधा देण्यासाठी पालिकेच्या वतीने प्रयत्न केले जाते. तसेच  व्यापारी दृष्ट्या रहिमतपूरला वेगळे स्थान मिळवण्यासाठी आणि छोट्या-मोठ्या व्यावसायिकांना बाजाराचा फायदा होणार आहे..
उपनगराध्यक्ष बेदील माने म्हणाले, रहिमतपुरमध्ये देखील अश्‍वपालक असल्याने, घोडेखरेदी आणि त्यांचा सांभाळ याबाबत वैचारिक देवाण घेवाण होत आहे.  घोड्यांच्या बाजारासाठी येणार्‍या काळात वेगळी आर्थिक तरतुद करणार असल्याचे माने यांनी सांगितले.