स्वातंत्र्यसैनिक वसंतराव दीक्षित यांचे निधन
कोरेगाव, दि. 29 (प्रतिनिधी) : ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक, जिल्हा वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे संस्थापक वसंतराव रामचंद्र दीक्षित (वय 91) यांचे प्रजासत्ताकदिनाच्या पहाटे उपचारादरम्यान निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.वसंतराव दीक्षित यांना 7 जानेवारी रोजी कोरेगावमधील आझाद चौकात रस्त्यावर दुचाकीने पाठीमागून धडक दिल्याने अपघात झाला होता. यामध्ये ते गंभीर जखमी झाले होते. त्यांच्यावर सातारा येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान प्रजासत्ताकदिनाच्या पहाटे त्यांचे निधन झाले.
संयुक्त महाराष्ट्र लढा, गोवा मुक्ती आंदोलनात त्यांचे मोठे योगदान होते. सुमारे 30 वर्षे त्यांनी कोरेगावमध्ये वृत्तपत्र विक्रेते म्हणून काम केले. तसेच जिल्ह्यात वृत्तपत्र विक्रेत्यांना न्याय मिळण्यासाठी त्यांनी जिल्हास्तरावर वृत्तपत्र विक्रेता संघटनेची स्थापना करून अनेक वर्षे या संघटनेचे अध्यक्ष म्हणून काम केले. कोरेगावमध्ये ग्राहक पंचायतीची स्थापना केली. सन 1936 पासून ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून कार्यरत होते. सन 1948 मध्ये संघावर बंदी घालण्यात आली. त्यावेळी या लढ्यामध्ये त्यांनी हिरहिरीने भाग घेतला होता.
कोरेगाव रेल्वे आंदोलनातही त्यांचा मोठा सहभाग होता. काही आंदोलनांमध्ये त्यांना अटक झाली होती. मात्र, समाजासाठी कार्य करताना ते थांबले नाहीत. अशी महान व्यक्ती स्वा. सै. वसंतराव दीक्षित यांचे निधन झाल्याने संपूर्ण जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पार्थिवावर संगम माहुली येथे कैलास स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.