Breaking News

विश्‍वनायक प्रेरणा पुरस्काराने डॉ. प्राची पाटील सन्मानित

ढेबेवाडी, दि. 13 (प्रतिनिधी) : महिला सबलीकरण क्षेत्रातील डॉ. सौ. प्राची पाटील यांचे कार्य दिपस्तंभासारखे आहे, असे प्रतिपादन अभिनेत्री वर्षा उसगांवकर  यांनी केले. अभिनेत्री वर्षा उसगांवकर यांचे हस्ते डॉ. प्राची पाटील यांना राज्यस्तरीय विश्‍वनायक प्रेरणादायी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्याप्रसंगी त्या  बोलत होत्या. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृह मुंबई येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी विधानसभेचे अध्यक्ष ना. हरीभाऊ राठोड, आ.  रामहरी रूपनवर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, वैद्यकिय सहाय्यता कक्ष प्रमुख ओमप्रकाश शेठे, कवयित्री अनघा तांबोळे, सिनेअभिनेते अशोक शिंदे इ. मान्यवर  उपस्थित होते.
उसगांवकर म्हणाल्या, समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो हा हेतू डोळ्यासमोर ठेवून डॉ. सौ. प्राची पाटील यांनी प्रा. ना. फाऊंडेशनच्या माध्यमातून  महिलांसाठी केलेले कार्य उल्लेखनीय आहे. महिला अबला नसून सबला आहेत याची जाणीव प्रा. ना. फाऊंडेशन मंद्रुळकोळेच्या माध्यमातून केलेले काम खर्‍या  अर्थाने डॉ. सौ. प्राची पाटील करत आहेत. त्यांच्या कार्याची दखल घेऊन क्रांती ग्रामविकास संस्था, बीड या संस्थेचे अध्यक्ष सुरेश यादव यांनी डॉ. सौ. प्राची  पाटील यांची पुरस्कारासाठी निवड केली.
क्रांती ग्रामविकास संस्था संचलित महात्मा फुले आश्रम शाळा बीड, यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी सामाजिक, शैक्षणिक, साहित्यिक, वैद्यकीय व महिला  सबलीकरण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणार्‍या व्यक्तींना प्रोत्साहन व प्रेरणा मिळावी या उद्देशाने विश्‍वनायक प्रेरणा पुरस्कार देण्यात येत असल्याचे संस्थेचे  अध्यक्ष सुरेश यादव यांनी सांगितले. प्रास्तविक संस्थेचे सुरेश यादव यांनी केले, सुत्रसंचलन नामदेव मुंढे व कु. आकांक्षा आंधळे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी  करण्यासाठी जनसंपर्क अधिकारी मुहसिनी कोकाटे, सारिका मोरे, अशोक लांडगे, शरद जावळे, संदीप कोकाटे, सुधीर करपे, विक्राम डोई यांनी परिश्रम घेतले.