Breaking News

भाविकांच्या सोयीसाठी प्रशासनामार्फत नियोजन : जिल्हा न्यायाधीश देशपांडे


सातारा, दि. 13 (प्रतिनिधी) : भाविकांच्या सोयीसाठी प्रशासन आणि देवस्थान समितीच्यावतीने योग्य नियोजन करण्यात आले आहे.  भाविकांनी प्रशासनास  सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा न्यायाधीश डी. डब्ल्यू देशपांडे यांनी केले.
वाई तालुक्यातील मांढरदेव येथील काळुबाईची आज पहाटे जिल्हा न्यायाधीश देशपांडे यांनी सपत्नीक महापूजा केली, त्यानंतर प्रातांधिकारी अस्मिता मोरे,  तहसीलदार अतुल म्हेत्रे, विश्‍वस्त यांनी महापुजा केली.
न्या. देशपांडे म्हणाले, काळुबाई यात्रा उत्सवाला कालपासून प्रारंभ झाला आहे. यात्रा कालावधीत प्रशासनाच्या सुत्रबध्द नियोजनामुळे यात्रा सुरळीत सुरु झाली  आहे. भाविकांना केंद्रस्थानी ठेवून देवस्थानने नियोजन केले आहे. भाविकांच्या सोयीसाठी वैद्यकीय पथके आणि  रुग्णवाहिका उपलब्ध करुन देण्यात आल्या  आहेत. सुरक्षिततेच्या दृष्टीने पोलीस आपली जबाबदारी पार पाडत असतांना भाविकांनीही सतर्क राहून प्रशासनास सहकार्य करत दर्शनाचा लाभ घ्यावा.
प्रातांधिकारी मोरे यांनी यावेळी प्रशासनाने केलेल्या नियोजनबाबत सविस्तर माहिती दिली. यावेळी  देवस्थान समितीचे विश्‍वस्त अ‍ॅड. महेश कुलकर्णी, अ‍ॅड. मिलींद  ओक, सचिव रामदास खामकर, सहसचिव लक्ष्मण चोपडे, चंद्रकांत मांढरे, जीवन मांढरे, गुरव रामदास क्षीरसागर, सोमनाथ क्षीरसागर, राजगुरु कोचळे उपस्थित  होते.
गायकवाड दाम्पत्याला महापूजेचा लाभ
दरवर्षी दर्शनाच्या रांगेत उपस्थित असलेल्या एका भाविक जोडप्यालाही काळुबाईच्या महापूजेचा लाभ दिला जातो. यावर्षी भगवान गायकवाड व सौ. सत्यभामा  गायकवाड, कुरकुंडी, ता. खेड, जि. पुणे येथून आलेले हे दाम्पत्य यंदाच्या महापूजेचे मानकरी ठरले. गायकवाड हे गेल्या 40 वर्षापासून सलग यात्रेनिमित्त  काळुबाईच्या दर्शनला येत आहेत. महापूजेचा लाभ मिळाल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. महापुजेचे मानकरी ठरलेल्या या दाम्पत्याचा न्या. देशपांडे यांच्या  हस्ते सत्कार करण्यात आला.