Breaking News

पॅरामिलिट्री फोर्सना परवानगीशिवाय सोशल मीडिया वापरण्यास बंदी

नवी दिल्ली, दि. 14 - केंद्रीय गृहमंत्रालयानं पॅरामिलिट्री फोर्सना परवानगीविना सोशल मीडिया वापरण्यास बंदी घातली आहे. बीएसएफ आणि सीआरपीएफच्या जवानांचे व्हिडिओ लागोपाठ समोर आल्यानंतर केंद्रीय गृहमंत्रालयानं सावध पवित्रा घेतला आहे. ट्विटर, फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप, इंस्टाग्राम आणि यूट्यूब यासारख्या सोशल मीडियांचा वापर पॅरामिलिट्रीतील जवानांना यापुढे संमतीशिवाय करता येणार नाही. कुठलेही वैयक्तिक फोटो किंवा व्हिडिओ त्यांना सोशल मीडियावर पोस्ट करता येणार नाहीत. पॅरामिलिट्री जवानांना कुठलीही पोस्ट सोशल मीडियावर टाकण्यापूर्वी त्यांच्या वरिष्ठांची परवानगी घ्यावी लागेल.
गेल्या काही वर्षांमध्ये अधिकाधिक जवानांकडे स्मार्टफोन आले आहेत. त्यापैकी अनेक जण सोशल मीडियावर अ‍ॅक्टिव्हही असतात. ही सवय कमी करण्यासाठी कडक शिस्तीचं पालन करण्यात येणार असल्याचं केंद्रीय गृहराज्यमंत्री किरेन रिजीजू यांनी स्पष्ट केलं. पॅरामिलिट्री जवान आणि आर्मी जवानांमध्ये मोठा भेदभाव होत असल्याचा आरोप पॅरामिलिट्री जवानांनी केला आहे. मात्र आर्मीच्याही अनेक युनिट्समध्ये याआधीच स्मार्टफोनवर बंदी घालण्यात आली आहे. त्याचं कडेकोट पालन आता केलं जात आहे.