Breaking News

नरेंद्र मोदी यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा; काँग्रेसची मागणी

पुणे, दि. 16 - खादी ग्रामोद्योगाच्या दिनदर्शिका आणि रोजनिशीवरुन महात्मा गांधींचे छायाचित्र हटवून त्या जागी नरेंद्र मोदींचे छायाचित्र प्रसिध्द केल्याने   देशभरात संतप्त पडसाद उमटत आहेत. 
काँग्रेसही याविरोधात आक्रमक झाली असून रविवारी पुण्यात काँग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात आले. नरेंद्र मोदी यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा,  अशी मागणी या आंदोलनादरम्यान करण्यात आली.
काँग्रेसतर्फे पुण्यातील महात्मा गांधी पुतळ्याजवळ आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात शहर अध्यक्ष रमेश बागवे, माजी आमदार मोहन जोशी, दिप्ती चौधरी,  महापालिकेतील गटनेते अरविंद शिंदे आदी नेतेमंडळी सहभागी झाली होती. नरेंद्र मोदींवर टीका करताना रमेश बागवे म्हणाले, नरेंद्र मोदी यांच्याविरोधात  देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला पाहिजे. मोदींनी महात्मा गांधींजींचे छायाचित्र हटवून त्यांचा अपमान केला आहे. देशातील जनता मोदींना धडा शिकवल्याशिवाय  राहणार नाही, असे म्हटले. आंदोलनाप्रसंगी सरकारविरोधात जोरदार घोषणा बाजी करण्यात आली.
खादी ग्रामोद्योगच्या दिनदशका आणि रोजनिशींवर महात्मा गांधींचे चरख्यावर सूत कातत असलेले छायाचित्र हटवून त्या जागी मोदींचे छायाचित्र झळकले आहे.
या प्रकारामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी खादी आणि गांधीजी हे आपला इतिहास, आत्मसन्मान आणि संघर्ष  यांचे प्रतीक आहे. गांधीजींचे छायाचित्र हटवणे हे पाप आहे, अशी टीका केली होती