Breaking News

चाकूचा धाक दाखवून भाजी विक्रेत्याकडून मुलीवर अत्याचार; आरोपी गजाआड

पुणे, दि. 16 - आजीला रुग्णालायत भेटण्यासाठी चाललेल्या मुलीला भाजी विक्रेत्याने रुग्णालयात सोडतो असे सांगत दुचाकीवर बसवून निर्जनस्थळी नेऊन  चाकूचा धाक दाखवून अत्याचार केला. ही धक्कादायक घटना शनिवारी (दि.14) दुपारी साडेचारच्या सुमारास पिंपरी, संत तुकारामनगर येथे घडली. याप्रकरणी  पोलिसांनी नराधम भाजी विक्रेत्याला गजाआड केले आहे. 
 इलाही हुसेनलाल शेख (वय 38, रा. महात्मा फुलेनगर, भोसरी) असे अटक केलेल्या नराधम भाजी विक्रेत्याचे नाव आहे. याप्रकरणी पीडित 19 वर्षीय महिलेने  पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.   पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी इलाही भाजी विक्रीचा व्यवसाय करतो. संत तुकारामनगर परिसरात तो  भाजीचा गाडा लावत असतो. पीडिता मुलगी व आरोपी इलाही एकमेकांच्या ओळखीचे आहेत. मुलीच्या आजीवर वायसीएम रुग्णालयात उपचार सुरु आहेत.  शनिवारी दुपारी साडेचारच्या सुमारास ती आजीला भेटायला चालली होती.
त्यावेळी आरोपी इलाही याने तिला रुग्णालयात सोडतो म्हणून बळजबरीने दुचाकीवर बसवले. त्याने तिला रुग्णालयात न नेता वल्लभनगर परिसरात निर्जनस्थळी  घेऊन गेला. तिच्या डोक्यात दगड मारला, तिला चाकूचा दाख दाखवला तसेच हाताला चावा घेतला आणि तिच्यावर अत्याचार केला.  त्यानंतर आरोपी इलाही हा  पसार झाला होता.
 पीडित तरुणी वल्लभनगर येथील बस स्थानकात आली. तेथील सुरक्षा रक्षकाने तिला उपचारासाठी रुग्णालयात नेले. त्यावेळी रुग्णालयीत मुलीच्या नातेवाईकांनी  तिला जखमी अवस्थेत पाहिले. त्यानंतर तिला संत तुकारामनगर चौकीत घेऊन आले. महिला पोलीस कर्मचार्‍यांनी तिची चौकशी केल्यानंतर हा धक्कादायक प्रकार  उघडकीस आला.
त्यानंतर उपायुक्त गणेश शिंदे, सहाय्यक आयुक्त राम मांडुरके, वरिष्ठ निरीक्षक विजयकुमार पळसुले, सहाय्यक निरीक्षक गजानन कडाळे, फौजदार रत्ना सावंत,  हरिश माने आदींनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी रात्री साडेदहाच्या आरोपीला गजाआड केले. पिंपरी पोलीस तपास करत आहेत.