Breaking News

डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहित्य अकादमी लवकर सुरू करण्याचे आवाहन

लातूर, दि. 16 - भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125 व्या जयंतीची स्मृती म्हणून महाराष्ट्र सरकारने डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहित्य  अकादमी सुरू करण्याचा संकल्प बाळगला आहे, तो स्तुत्य आहे ही साहित्य अकादमी सुरू करण्याची सूचना लातूर येथील 34 व्या अस्मितादर्श साहित्य  संमेलनाच्या समारोपातील खुल्या अधिवेशनात एका ठरावाद्वारे करण्यात आली. या ठरावासह या संमेलनात एकूण 10 ठराव मंजूर करण्यात आले आहेत.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या लेखनाचे जे खंड महाराष्ट्र सरकारने इंग्रजी भाषेत प्रकाशित केले आहेत, त्या समग्र खंडांचा अनुवाद मराठी, हिंदी आणि भारतातील  सर्व प्रादेशिक भाषेत करावा असा अग्राह राज्य व केंद्र सरकारकडे करण्यात आला. ठराव क्रमांक 03 द्वारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या लेखनाचे खंडात्मक  पुनर्मुद्रण करून ते वाचकांना उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी राज्य सरकारकडे करण्यात आली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मानवमुक्तीच्या  चळवळीत ज्या कार्यकर्त्यांनी सक्रीय सहभाग नोंदविला, अशा कार्यकर्त्यांना सामाजिक स्वातंत्र्य सैनिक समजून त्यांना स्वातंत्र्य सैनिकांच्या सर्व सोयी सवलती  उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी ठराव क्रमांक 04 द्वारे करण्यात आली आहे. विपुल प्रमाणात पाली वाड्.मय उपलब्ध आहे. मात्र या वाड्.मयाचा संशोधनात्मक  शोध घेण्यासाठी स्वतंत्र विद्यापिठाची आवश्यकता आहे. जगभरातील अभ्यासक आणि संशोधकांच्या सोयीसाठी महाराष्ट्र शासनाने पाली भाषा व वाड्.मय  विद्यापीठाची स्थापना करावी अशी मागणी ठराव क्रमांक 05 द्वारे राज्य सरकारकडे करण्यात आली. ठराव क्रमांक 06 द्वारे मराठी भाषेचा जन्म मराठवाडा प्रदेशात  झाल्याचे ऐतिहासिक पुरावे उपलब्ध झाले आहेत म्हणून राज्य शासनाने मराठी भाषा व वाड्.मय विद्यापीठ अंबाजोगाई येथे स्थापन करावे, अशी सूचना राज्य  सरकारकडे करण्यात आली आहे. अनुसूचित जाती व जमातीच्या विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षणासाठी पाठविण्याची योजना राज्य सरकारने बंद केली आहे. हे  अन्यायकारक आहे, ही योजना पूर्ववत सुरू करून सामाजिक न्यायाचे तत्व राज्य शासनाने अंगिकरावे, असा आग्रह ठराव क्रमांक 07 द्वारे धरण्यात आला आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्या स्थळांना भेटी दिल्या, त्या ठिकाणी, त्यांचे स्मारक उभे करून त्या स्थळांना पर्यटन क्षेत्राचा दर्जा देऊन, ती स्थळे विकसित  करावी, अशी मागणी ठराव क्रमांक 08 द्वारे करण्यात आली आहे. डॉ. बाबासाहेब अंबेडकर यांच्या 125 व्या जयंतीचे औचित्य साधून लातूर येथे डॉ. बाबासाहेब  आंबेडकर यांच्या नावाने प्रशस्त असे सांस्कृतिक सभागृह आणि सुसज्ज ग्रंथालय लातूर महानगरपालिकेने निर्माण करावे, अशी मागणी ठराव क्रमांक 09 द्वारे  करण्यात आली आहे. ठराव क्रमांक 10 द्वारे अनुसूचीत जाती, जमाती संरक्षण कायदा (अ‍ॅट्रॉसिटी) संबंधाने समाजात संभ्रमाचे वातावरण निर्माण केले जात आहे.  गेल्या पाच वर्षातील अन्यायाचा मागोवा घेतला तर त्याचा आलेख सतत वाढत गेल्याचे आपल्या लक्षात येईल, त्यामुळे संमेलन त्या कायद्याचे कडक अंमल  बजावणी करावी, अशी मागणी केंद्र सरकारकडे करण्यात आली आहे.
34 व्या अस्मितादर्श साहित्य संमेलनातील खुले अधिवेशनातील या ठरावांचे सूचक अस्मितादर्श चळवळीचे प्रणेते डॉ. गंगाधर पानतावणे, संमेलनाचे कार्याध्यक्ष प्रा.  सुधीर अनवले, डॉ. भगवान वाघमारे, संमेलनाचे समन्वयक डी. एस. नरसिंगे, स्वागताध्यक्ष जयप्रकाश दगडे, कार्यावाहक राजेंद्र लातूरकर, शंकर भारती,  समन्वयक डॉ. विजय अजनीकर, डॉ. ऋषीकेश कांबळे हे असून या ठरावांना संमलनाध्यक्षा डॉ. प्रज्ञा दया पवार, संमेलनाच्या संयोजन समितीचे अध्यक्ष प्राचार्य  डॉ. माधव गादेकर, कार्यवाहक डॉ. अशोक नारनवरे, उपाध्यक्ष प्रा. हर्षवर्धन कोल्हापूरे, सह कार्यावाह संयज घाडगे, समन्वयक यु. डी. गायकवाड, माधव  क्षीरसागर, प्रा. दत्ता ओव्हाळ, सहकार्यावह प्रा. जयप्रकाश हुमणे, डॉ. कृष्णा किरवले यांनी अनुमोदन दिले आहे.