Breaking News

भाजपा पक्षश्रेष्ठींनी घेतल्या इच्छूक उमेदवारांच्या मुलाखती

बुलडाणा, दि. 22 - भारतीय जनता पार्टीने जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी  सक्षम उमेदवारांची चाचपणी सुरू केली असून त्याचाच एक भाग  म्हणून जिल्ह्यातील घाटावरच्या तालुक्यातील उमेदवारांच्या मुलाखती आज दि. 21 रोजी येथील भारतीय जनता पार्टीच्या जिल्हा कार्यालयात घेण्यात आल्या.  यावेळी महिलांची उपस्थिती  लक्षणीय होती. 
भारतीय जनता पार्टीच्या वतीने घाटावरील बुलढाणा, चिखली, सिंदखेडराजा, देऊळगांवराजा, लोणार, मेहकर, मोताळा या तालुक्यातील जिल्हा परिषद  व पंचायत समितीच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यासाठी जिप व पंस  निवडणुकीचे जिल्हा प्रभारी तथा कृषीमंत्री भाऊसाहेब फुंडकर, राज्य सरचिटणीस  आ. संजय कुटे, जिल्हाध्यक्ष धृपदराव सावळे, राज्य कार्यकारिणी सदस्य अ‍ॅड. विजय कोठारी,  बुलढाणा विधानसभा संपर्क प्रमुख योगेंद्र गोडे, जिल्हा महिला  अध्यक्षा अर्चना पांडे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य श्‍वेता महाले, जिल्हा सरचिटणीस मोहन शर्मा, विश्‍वनाथ माळी, नंदु अग्रवाल, संतोषबापू देशमुख, भाजयुमोचे  जिल्हाध्यक्ष सचिन देशमुख, अनुसूचित जाती मोर्चाचे अध्यक्ष यादव भालेराव, अनुसूचित जमाती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष गजानन सोळंकी उपस्थित होते.
भारतीय जनता पार्टीकडून जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या जागांसाठी इच्छुकांकडून अर्ज मागविण्यात आले होते. त्याला कार्यकर्त्याकडून चांगला  प्रतिसाद मिळाला. सात तालुक्यातून  जिप व पंसच्या जागांसाठी जवळपास   846 इच्छुक उमेदवारांनी मुलाखती दिल्या आहे. सकाळी 11 वाजेपासुन सुरू  झालेल्या या मुलाखती रात्री पर्यत सुरूच होत्या. यामध्ये जिल्हा परिषद सदस्य भगवान मुंडे, अभय चव्हाण, विनोद चव्हाण यांचेसह अनेक इच्छुक उमेदवारांनी  मुलाखती दिल्या. यावेळी सातही तालुक्याचे तालुकाध्यक्ष कार्यकर्त्यांसह मोठया संख्येने उपस्थित होते.
घाटाखालील मुलाखती 24 जानेवारी रोजी
जिल्ह्यातील घाटाखाली मलकापूर, खामगांव, शेगांव, नांदूरा, जळगांव जामोद, संग्रामपूर तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या भाजपाच्या इच्छुक  उमेदवारांच्या मुलाखती 24 जानेवारीला दुपारी 3 वाजता हॉटेल विघ्नहर्ता शेगांव येथे आयोजित करण्यात आलेल्या आहेत. दुपारी 3 ते 5 या दरम्यान मलकापूर,  नांदूरा, जळगांव जामोद, संग्रामपूर या तालुक्यासाठी व 5 ते 7 दरम्यान खामगांव व शेगांव तालुक्यासाठी मुलाखत होतील. भाजपाच्या इच्छुक उमेदवारांची  मुलाखतीसाठी उपस्थित रहावे असे आवाहन जिल्हाध्यक्ष धृपदराव सावळे यांनी केले आहे.