Breaking News

सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या नोकर भरतीला स्थगिती


सातारा, दि. 22 (प्रतिनिधी) : जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेतील नोकर भरतीला स्थगिती  मिळाली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातून याबाबतचे पत्र बँकेला मिळाले आहे. या पत्रानंतर अर्ज दाखल करून घेण्याची प्रक्रिया थांबविण्यात आली असल्याची  माहिती जिल्हा बँकेतून देण्यात आली. दरम्यान, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या तोंडावरच ही स्थगिती मिळाल्यामुळे इच्छुक उमेदवारांच्या  आशेवर पाणी फिरले आहे.
सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेत 244 लेखनिक आणि 132 शिपाई पदाच्या जागा भरावयाच्या आहेत. त्यासाठीचा नोकर भरतीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे.  त्यानुसार दि. 6 जानेवारीपासून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु झाली होती. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या तोंडावर ही भरती सुरु झाल्यामुळे  त्याला स्थगिती मिळावी याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली होती. त्यातच जिल्हा बँकेचे संचालक आ. जयकुमार गोरे नोकर भरतीमध्ये अडथळे आणत  असल्याची तक्रार जिल्हा बँकेच्या संचालकांनी बँकेचे उपाध्यक्ष सुनील माने यांच्याकडे केली होती.
सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेतील नोकर भरती जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणूकांची आचारसंहिता लागू झाले असल्याचे  कारण देत स्थगिती देण्यात  आली. आम्ही निवडणूक आयोगाच्या निर्णयाचा आदर करतो. आचारसंहिता संपल्यानंतर ही प्रक्रिया सुरु होणार आहे. ज्यांनी अर्ज भरले आहेत ते अर्ज तसेच  कायम राहणार आहेत. त्यांनी पुन्हा नव्याने अर्ज भरण्याची गरज नाही, अशी माहिती जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष सुनील माने यांनी दिली.
सातारा जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी दि. 21 फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. त्यामुळे दि. 11 जानेवारीपासून जिल्ह्यात नगरपालिका क्षेत्र  वगळता सर्वच ठिकाणी आचारसंहिता लागू झाली आहे. तत्पूर्वीच जिल्हा बँक नोकर भरतीची जाहिरात सुटली होती. आता या नोकर भरतीला आचारसंहिता  संपेपर्यंत स्थगिती मिळाली आहे. या अनुषंगाने सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेत संपर्क साधला असता सांगण्यात आले की, जिल्हाधिकारी अश्‍विन मुद्गल यांनी  आचारसंहितेचे कारण दाखवून नोकर भरती प्रक्रियेला स्थगिती दिल्याचे नमूद केले आहे. सातारा जिल्हा बँकेतील संचालक मंडळ हे राजकीय पक्षाशी संलग्न  असल्यामुळे नोकर भरतीला स्थगिती देण्यात येत असल्याचाही त्यात पत्रात उल्लेख केला आहे.