एकसंघ भारत हे संविधानाचे यश !
दि. 27, जानेवारी - डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधानाची निर्मिती करुन 26 नोव्हेंबर 1949ला देशाला समर्पित केले. 26 जानेवारी 1950ला संविधान देशात लागू झाले. आणि जनता खर्या अर्थाने सार्वभैम झाली. म्हणून हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो. भारतीय संविधान देशाला समर्पित करताना डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी, संविधान आदर्श आहे पण त्याची आदर्शता ही त्याची अंमलबजावणी करणार्यांवर अवलंबून आहे. त्यांच्या या विधानात साशंकता होती. ही साशंकता राज्यकर्त्यांविषयी होती. हा राज्यकर्ता वर्ग या देशातील उच्च जातियांतून आलेला बुध्दिजीवी वर्ग होता व आहे. या वर्गाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी खूप आधिच अनितीमान वर्ग असे म्हटले होते. त्यांच्या मते जगातील कोणत्याही देशातील समाजावर त्या देशाच्या बुध्दिजीवी वर्गाचा प्रभाव असतो, तसा तो भारतीय सजामाजावरही आहे. पण येथे बुध्दिजीवी वर्ग असणारा ब्राह्मण वर्ग हा समाजाला एक संघ करु इच्छित नाही. किंबहुना वरच्या जातींनी खालच्या जातीचे शोषण करीत रहावे यासाठी आपली बुध्दी खर्च करणारा वर्ग आहे. हे त्यांना माहित असल्यामुळेच त्यांनी संविधान समर्पण सभेच्या भाषणात संविधानाच्या यशस्वी अंमलबजावणीवर भर दिला. भारतीय राज्य घटनेनुसार मनुष्याला जन्मत:च मुलभूत हक्क प्रदान केले आहेत. या हक्कांचे संरक्षण करण्याची जबाबदारी आपल्या राज्य सरकारची असते. मुलभूत हक्कांमध्ये भाषण, संचार, शिक्षण, प्रचार स्वांतत्र्य इत्यादी अनेक अधिकार येतात. या हक्कास बाधा निर्माण झाली असेल तर न्यायपालिकेमार्फत दाद ही मागता येते. मात्र संविधानातील या अतिमहत्वपुर्ण तरतुदीचा सर्वसामान्य माणूस आपल्या न्याय हक्कासांठी उपयोग किती प्रमाणात करतो. तो किती सजग आहे. सर्वसामान्य माणसांला आपल्या न्याय हक्कांचा पुरेपुर वापर करण्यासाठी शासनाकडून त्यांना मार्गदर्शन करण्यात येते करा? यासह विविध प्रश्न या प्रजासत्ताक दिनानिमित्त निर्माण होत आहे.भारताला प्रजासत्ताक होवून 67 वर्षांचा कालावधी लोटला आहे. या काळात आम्ही किती पुढे गेलो किंवा यशस्वी झालो याचा ताळेबंद पाहाणे गरजेचे आहे. संविधानाच्या निमित्ताने देश एकसंध ठेवण्याचे काम मागील 67 वर्षात झाले आहे. भारतीय संविधान हे केवळ कायदे असणारे, नियम असणारे संविधान नसून, ते जगातील सर्वोकृष्ट मुल्यांचा परिपाक आहे. संविधानामध्ये अनेक तरतुदींचा समावेश कालातंराने करण्यात आला असला तरी, त्यातील मूूल्यांना हात लावण्याचे धाडस कोणत्याही राज्यकर्त्यांना झाले नाही. कारण संविधानामुळे आज भारत एकंसध असल्याचे बघायवास मिळतो. त्याचाच परिपाक म्हणून आज आपण विज्ञान तंत्रज्ञान असो की, कोणतेही क्षेत्र असो त्यात गरूडझेप घेतली आहे. मात्र अजुनही 67 वर्षांच्या कालावधी लोटल्यानंतरही काही गोष्टीची अंमलबजावणी करण्यास राज्यकर्ते धजावले नाहीत. त्यामुळे अनेक प्रश्न, समस्या समोर आहेत. मात्र त्याकडे लक्ष देण्यास आज लोकप्रतिनिधींना वेळ नाही, हीच मोठी शोकातिंका म्हणावी लागेल. जनतेचे प्रतिनिधी आणि त्यांचे कार्य सर्वांना मार्गदर्शक होईल, असेच असले पाहिजे अन्यथा त्याने जनप्रतिनिधी म्हणवून घेऊ नये. हे प्रजासत्ताक जनतेचे आहे. सर्वसामान्य ‘प्रजेच्या’हाती सत्ता असल्याचा विश्वास जोपर्यंत सर्वसामान्यांना वाटत नाही तोपर्यंत प्रजासत्ताक म्हणवून घेण्याचा हक्क आपल्याला नाही.
