Breaking News

तालुक्यातील डावपेचाचे राजकारण संपवणार ः अजितराव

सांगली, दि. 19 - तालुक्यातील जिल्ह्यात डावपेचाचे राजकारण सुरु आहे. वापर करुन सोडून देण्याची प्रवृत्ती आता थांबवण्यासाठी मी कंबर कसली आहे, असे  प्रतिपादन माजी मंत्री अजितराव घोरपडे यांनी केले.
सावर्डे (ता. तासगांव) येथे महिला सरपंच दिलशान मुजावर यांचा सत्कार कार्यक्रम व शेतकरी मेळाव्यात ते बोलत होतेयावेळी दिलीप पाटील, माजी उपसभापती विश्‍वास पाटील उपस्थित होते.
घोरपडे म्हणाले की, जिल्ह्यात अनेक पैलवान आहेत. ते कधी आणि कुठली टांग मारतात, हे पडल्यावरच कळतं. राजकारणातील या विकृतींना मी थांबवणार  आहे. सत्ता मिळवायची भूमिका आता माझी राहिली नाही, मात्र आमच्या घरावर दरोडा घातला, तर आम्ही अशी लोकांना सोडणार नाही. तासगांव तालुक्यात  राजकीय भूकंप करण्यासाठी नाही, तर स्वाभिमानी विकास आघाडीमार्फत शेतकर्‍यांच्या पाण्यासाठी संघर्षाची आमची भूमिका आहे.
अनेक वर्षांपासून सुरु असलेले पाण्याचे राजकारण आता बंद करण्याची गरज आहे.
जनताही अशा गोष्टीला आता कंटाळली आहे. शेतीमालावर प्रक्रिया उद्योगाच्या माध्यमातून हजारो तरुणांना काम मिळू शकते, मात्र तो उभारला जात नाही.  शेतीमाल ऑनलाईन विकला तरच शेतकर्‍यांना फायदा होईल, असे ते म्हणाले.
स्वप्नील पाटील म्हणाले, तासगाव तालुक्यात पाठीत वार करणारी मंडळी वाढत आहेत. अशा प्रवृत्ती वाढल्या आहेत शेतकर्‍यांच्या नावावर मते मागायची, मात्र  पाणी मागितले की त्याच शेतकर्‍याला खेळवले जाते. यापुढे असले राजकारण करणार्‍यांना आम्ही स्वाभिमानी विकास आघाडीमार्फत लगाम घालणार आहोत.  जनतेनेही अशा लोकांना तारा न देता जागा दाखवावी.
वायफळेचे ग्रामपंचायत सदस्य शिवाजी पाटील यांच्यासह अनेकांनी यावेळी प्रवेश केला. इंद्रनील पाटील यांनी स्वागत केले.