Breaking News

जात पडताळणीचे आठ हजार प्रस्ताव प्रलंबित

जात पडताळणी समिती अध्यक्षाचा बेजबाबदारपणा

बुलडाणा, दि. 20 - जिल्ह्यातील लोकांची जात पडताळणीची कामे सोपी व जिल्ह्यातच व्हावीत, या हेतूने सहायक आयुक्त समाजकल्याण विभागाच्या  सामाजिक न्याय भवनाच्या मुख्य इमारतीमध्ये जात पडताळणी विभागाचे स्वतंत्र कार्यालय सुरु करण्यात आले असताना नागरिकांची प्रचंड आर्थिक पिळवणूक होत  आहे. बुलडाणा येथे कार्यालय सुरु झाल्यापासून अंदाजे आठ हजार पाचशे प्रकरणे दाखल झाली आहेत. त्यापैकी फक्त पाचशे प्रकरणे दक्षता समितीपुढे ठेवण्यात  आली असून ते निकाली काढण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली असल्याची माहिती समिती सदस्य वृशाली शिंदे यांनी दिली आहे. जात पडताळणी करण्यासाठी  त्रिसदस्यीय समिती नेमण्यात आली असून या समितीचे अध्यक्ष आय.एम.तिटकारे व सदस्य म्हणून सहायक आयुक्त समाजकल्याण, बुलडाणाचे वाठ हे प्रभारी  सदस्य असून सांगली येथून बदलीवर आलेल्या वृषाली शिंदे यांची पूर्णवेळ नियुक्ती असल्यामुळे त्यांच्यामार्फत काही प्रकरणे निकाली काढण्यात आली आहेत.  जात पडताळणी समितीचे अध्यक्ष आय.एम.तिटकारे व श्री.वाठ हे प्रभारी असल्यामुळे अर्जदारांशी बेजबाबदारीपणे वागत आहेत. तिटकारे यांच्या बेताल वर्तनामुळे  अर्जदार त्रस्त झाले आहेत. तर तिटकारे हे एजंटांमार्फत लाखो रुपये लाटत असून एजंटांचीच कामे लवकर करत असल्याची चर्चा आहे. तिटकारे हे महिलांसह  विद्यार्थ्यांशी असभ्य भाषेत बोलत असून समिती सदस्यांशी त्यांचा समन्वय नसल्यामुळे इतर सदस्य तिटकारे यांच्या कामामुळे त्रस्त आहेत. त्यांचा कुठल्याही  अधिकार्‍याशी समन्वय नसल्यामुळे अर्जदारांची कामे खोळंबली आहेत. तिटकारे हे आठवड्यातून एकच वेळ कार्यालयात हजर राहात असल्यामुळे व दुपारीच निघुन  जात असल्यामुळे अर्जदारांची प्रचंड गैरसोय होत आहे. अर्जदारांच्या प्रत्येक वेळी नवीन त्रृटी काढण्याचा प्रताप तिटकारे यांच्याकडून होत असल्याने अर्जदारांच  मानसिक छळ होत आहे. या कार्यालयात काम करणारे सर्व कर्मचारी कंत्राटी तत्वावर असल्यामुळे ते एजंटांमार्फत वसुली करत असल्याचे विदारक चित्र येथे दिसून  येत आहे. सदर परिस्थिती सुधारण्यासाठी या कार्यालयात पूर्णवेळ समिती अध्यक्ष व इतर सदस्य, वरिष्ठ लिपीक, दक्षता पथक, पथक समिती, संशोधन  अधिकारी यांची पूर्णवेळ नियुक्ती करणे गरजेचे आहे. तर तिटकारे यांचा बुलडाणा येथील प्रभार तात्काळ काढून कर्तव्यदक्ष अधिकार्‍यांची त्यांच्या जागी नेमणूक  करणे आवश्यक आहे.