Breaking News

समाजवादी पक्षातलं भांडण आता निवडणूक आयोगाच्या दार

नवी दिल्ली, दि. 02 - गेल्या 2 महिन्यांपासून सुरु असलेला समाजवादी पक्षातला गोंधळ थांबण्याचं नाव घेत नाही आहे. कारण सत्तेसाठी नाती-गोती वेशीला टांगणार्‍या यादव कुटुंबानं आता पक्षाच्या चिन्ह असलेल्या सायकलसाठी निवडणूक आयोगात धाव घेतली आहे.
समाजवादी पक्षाचं राष्ट्रीय अध्यक्षपद मिळवल्यानंतर अखिलेश यादव यांचं समाजवादी पक्षावर संपूर्ण नियंत्रण प्रस्थापित झालं आहे. पण असं असलं, तरी वडील मुलायम सिंह हे पक्षाचं चिन्ह आपल्याकडे राहावं यासाठी निवडणूक आयोगात पोहोचले आहेत. मुलायम सिंह आणि त्यांचे निकटवर्ती शिवपाल हे दोघेही आज दिल्लीत निवडणूक आयोगाकडे या चिन्हाच्या मागणीसाठी जाणार आहेत.
समाजवादी पक्षातल्या 200 हून अधिक आमदारांचा स्पष्ट पाठिंबा मिळाल्याने अखिलेश स्वतंत्र पक्ष स्थापन करेल अशी भीती वडिलांना आहे, आणि त्यामुळेच हा सगळा खटाटोप सुरु असल्याचे राजकीय वर्तुळात बोललं जात आहे. दरम्यान, या गोंधळामध्ये समाजवादी पक्षाचे 5 जानेवारी रोजी होणारे अधिवेशन मुलायम सिंह यांनी स्थगित केले असून, शिवपाल यादव यांनी ट्वीट करुन यासंबंधीची माहिती दिली.
पण पक्षाच्या चिन्हासाठी पिता-पुत्रच समोरासमोर उभे ठाकल्याने, पक्षामध्ये उभी फूट पाहायला मिळत आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अखिलेश यादव यांनी पक्षाची धुरा आपल्या खांद्यावर घेतल्यापासून पक्षाचे चिन्हवर दावा करणार आहेत. पण त्याआधीच मुलायम सिंह यांनी निवडणूक आयोगाचे दार ठोठावल्याने पक्षाचे चिन्ह कोणाकडे जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.