कापसाच्या वीस टक्के लागवडक्षेत्रात देशी कापूस हवा - कुलगुरू
नांदेड, दि. 20 - देशातील कापसाच्या एकूण क्षेत्रापैकी किमान 20 टक्के क्षेत्रावर देशी कापसाची लागवड होणे आवश्यक आहे. त्याकरिता विभागनिहाय योग्य वाणांची निवड करून त्यांचे मोठ्या प्रमाणात बिजोत्पादन घेणे आवश्यक असल्याचे मत परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. बी. व्यंकटेश्वरलू यांनी व्यक्त केले. नांदेड येथील कापूस संशोधन केंद्रामध्ये ‘देशी कापूस पुनरूज्जीवन बाबत एकदिवसीय कार्यशाळा दि. 16 जानेवारी रोजी आयोजित करण्यात आली होती. या कार्यक्रमामध्ये डॉ. व्यंकटेश्वरलू बोलत होते. कोरडवाहू लागवडीमध्ये लांब धाग्याचा देशी कापूस अधिक फायदेशीर ठरेल, असे मत हैद्राबाद येथील केंद्रीय कोरडवाहू संस्थेचे संचालक डॉ. श्रीनिवास राव यांनी यावेळी मांडले. या कार्यशाळेमध्ये देशी (गावराण) कापूस लागवडीविषयी शेतक-यांच्या अडचणी, त्यावरील उपाययोजना आणि देशामध्ये देशी कापसाचे क्षेत्र वाढविण्यासाठी दिशा याबाबत चर्चा करण्यात येऊन भविष्यासाठी कृतिआराखडा तयार करण्यात आला. या कार्यशाळेमध्ये कृषी विद्यापीठाचे संचालक संशोधन डॉ. दत्तप्रसाद वासकर, नागपूर येथील केंद्रीय कापूस संशोधन संस्थेचे डॉ. ब्लेझ डीसूझा, बेंगलुरू येथील सहज समृद्धी या स्वयंसेवी संस्थेचे श्रीकृष्णा प्रसाद, शास्त्रज्ञ डॉ. एल. ए. देशपांडे व डॉ. ए. एस. अनसिंगकर, खांडवा येथील प्रमुख कापूस शास्त्रज्ञ डॉ. शास्त्री उपस्थित होते. या कार्यशाळेमध्ये महाराष्ट्रातील नांदेड, परभणी, यवतमाळ, अकोला, औरंगाबाद, नंदुरबार या जिल्ह्यातील शास्त्रज्ञ व शेतकरी यांचे बरोबरच कर्नाटक, तमिळनाडू, गुजरात, मध्य प्रदेश व पश्चिम बंगाल या राज्यांतील देशी कापूस उत्पादक शेतकरी, शास्त्रज्ञ आणि कृषि विस्तार कार्यकर्ते यांनी सहभाग घेतला.
