Breaking News

राष्ट्रीय मल्लखांब स्पर्धा मिरजेत सुरु

सांगली, दि. 22 - राष्ट्रीय शालेय मल्लखांब स्पर्धेचा थरार शुक्रवारपासून मिरजेत सुरु झाला. चित्तथरारक प्रात्यक्षिकांच्या साक्षीने स्पर्धेचे उद्घाटन झाले. पहिल्याच  दिवशी यजमान महाराष्ट्र संघाच्या खेळाडूंनी विजयी सलामी दिली.
विविध राज्यांतून आलेल्या खेळाडूनी मान्यवरांना संचलनाव्दारे मानवंदना दिली. आदर्श स्पोर्टस् क्लबच्या खेळाडूंनी पुरलेला व दोरीवरील मल्लखांबची प्रात्यक्षिके  सादर केली.
आदिती करंबळेकर हिने खेळाडूंना शपथ दिली. जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांच्याहस्ते उद्घाटन झाले. फटाक्यांची आतषबाजी व ढोल ताशांच्या निनादात  स्पर्धेता प्रारंभ झाला. जिल्हा क्रीडाधिकारी अनिल चोरमले यांनी स्वागत केले. राष्ट्रीय प्रशिक्षक दीपक सावंत यांनी सूत्रसंचालन केले. प्राचार्य रमेश चराटे यांनी  आभार मानले.
यावेळी नवभारत शिक्षण मंडळाचे संचालक गौतम पाटील, जिल्हा मल्लखांब संघटनेचे अध्यक्ष सम्राट महाडिक, मिरजेचे तहसीलदार शरद पाटील, आदर्श शिक्षण  मंडळाच्या अध्यक्षा विनीता करमरकर, सचिव वीणा फडके, दीपक शिंदे-म्हैसाळकर, वास्तुविशारद प्रमोद चौगुले, स्पर्धा निरिक्षक गौरव दिक्षीत, बापू समलेवाले,  सुजित शेडगे, आमसिद्ध सोलणकर, शंकर भास्करे, तानाजी घार्गे, राहुल पवार, सतीश तासगावे, ओंकार शुक्ल आदी उपस्थित होते.
मिरजेतील आदर्श शिक्षण मंदिरच्या मैदानावर या स्पर्धा सुरु आहेत. जिल्हा क्रीडा परिषद, अ‍ॅक्रोबॅटिक्स असोसिएशन, जिल्हा मल्लखांब संघटना व आदर्श शिक्षण  मंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
प्राथमिक फेरीतील सामने रात्री उशिरापर्यंत विद्युत झोतात सुरु होते. यजमान महाराष्ट्र संघातील मुल्ला मुलींनी पहिल्याच दिवशी स्पर्धेवर वर्चस्व मिळवत आघाडी  घेतली. गुजरात, उत्तर प्रदेश व दिल्ली आदी राज्यांनी महाराष्ट्रासमोर आव्हान उभे केले आहे.