Breaking News

विकृत हाती जिल्हा परिषद जाऊ देणार नाही ः अजितराव घोरपडे

सांगली, दि. 22 - जिल्हा परिषदेची सत्ता विकृत हाती जाऊ द्यायची नाही यासाठी पूर्ण ताकदीने लढावे लागेल, असे वक्तव्य, माजी मंत्री अजितराव घोरपडे यांनी  केले. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी त्यांनी इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या. सहा गटातील इच्छुक व कार्यकर्ते उपस्थित होते.
निवडणुकीसाठी घोरपडे यांच्याकडून स्वाभिमानी विकास आघाडी स्थापन करण्याचे संकेत मिळत आहेत. राष्ट्रवादीशी युतीचीही भाषा ते बोलत आहेत. युती अद्याप  झाली नसली तरी आजच्या बैठकीला राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष आप्पासाहेब हुळ्ळे उपस्थित होते. विधानसभा मतदान क्षेत्राध्यक्ष शंकरराव गायकवाड, राष्ट्रवादीचे  पंचायत समिती सदस्य अरुण राजमाने यांच्यासह राजवर्धन घोरपडे, बाजार समितीचे संचालक दीपक शिंदे, जिल्हा बँकेचे संचालक बाळासाहेब होनमोरे, प्रमोद  इनामदार, आनंदराव भुई, दादासाहेब पाटील उपस्थित होते. गेल्या आठवड्यात जयंत पाटील यांनी राष्ट्रवादीतर्फे मुलाखती घेतल्या. श्री. घोरपडे यांच्याशी बोलणे  झाल्याचे त्यांनी सांगितले होते. त्यानुसार आजच्या बैठकीत विकास आघाडी व राष्ट्रवादी यांची युती झाल्याचे वातावरण होते. बेडग, आरग, भोसे, म्हैसाळ, एरंडोली  व मालगाव गटातील इच्छुकांच्या मुलाखती त्यांनी घेतल्या. उमेदवारी निश्‍चितीचा निर्णय मात्र झाला नाही.
राष्ट्रवादीसोबत आघाडी कशी करायची, चिन्हे कोणते घ्यायचे, आघाडी सर्वच ठिकाणी करायची काय? आघाडी झाल्यास इच्छुकांना न्याय कसा मिळणार अशा  विविध प्रश्‍नांवर चर्चा झाली. घोरपडे म्हणाले काीं दिवसांत विकास आघाडीच्या स्तरावर थोडासा विस्कळीतपणा आल्याचे मान्य आहे. आता पुन्हा नव्याने बांधणी  करायची आहे. नवी बांधणी नक्कीच कार्यकर्त्यांच्या सोयीची असेल. जिल्हा परिषद विकृत हातात जाऊ नये, अशी इच्छा आहे. तुमच्या सहकार्याने निश्‍चितपणे यश  मिळेल. कार्यकर्त्यांनी मागणी केली, की आवश्यक तेथे राष्ट्रवादीसोबत युती करावी. एका गटातील तीनही उमेदवारांना एकच चिन्ह असेल याची काळजी घ्यावी.