Breaking News

युती करणार असाल तर रस्ते घोटाळ्याचं काय? : सुप्रिया सुळे

मुंबई, दि. 17 - एकीकडे  भ्रष्टाचाराचे आरोप करायचे आणि दुसरीकडे युतीसाठी वाटाघाटी करायच्या, ‘यालाच पार्टी विथ डिफ्रन्स’ म्हणायचं का, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजपला विचारला. युती करणार असाल तर रस्ते घोटाळ्याचं काय? भाजपला नेमकी कोणती पारदर्शकता हवी आहे, या प्रश्‍नांची उत्तरं भाजपनं द्यावी, अशी मागणीही सुप्रिया सुळे यांनी केली.
आम्ही विकासाच्या मुद्द्यांवर निवडणूक लढतो. मी मुंबईत राहते, रस्ते, पाणी या समस्या आहेत. मी स्वतः कन्फ्युज आहे, कारण मनपा मधला रस्ते घोटाळा हा भाजपने काढला, भाजप म्हणतं आम्हाला पारदर्शी कारभार हवा, मग रस्ते घोटाळ्याचे काय झालं? त्याचा थेट आरोप शिवसेनेवर आहे, मग आता यांच्यात युती होणार असेल तर सर्व भ्रष्ट लोकं एकत्र येत आहेत, असा घणाघात सुप्रिया सुळे यांनी केला. मुंबई महापालिकेतील रस्ते घोटाळा भाजप नेत्यांनीच बाहेर काढला. आता तीच भाजपा शिवसेनेशी युती करत आहे, असं सुप्रिया म्हणाल्या.
शिवसेना आणि मुंबई पालिकेच्या कारभारावर भाजप आरोप करते. मग आता हेच त्यांचं पार्टी विथ डिफ्रन्स आहे का? आधी आरोप करायचे आणि मग युती करायची हेच पार्टी विथ डिफ्रन्स आहे का असा सवाल सुप्रिया सुळेंनी केला. शिवसेना, मनसे आता मॉर्डन होत आहे. पूर्वी व्हॅलेंटाईन डेला ते विरोध करायचे, आता ते सेलिब्रेट करत आहेत. त्यांच्या नेत्यांची मुलंच इंग्रजी माध्यमांतील शाळांत शिकत आहेत, असा टोला सुप्रिया सुळेंनी उद्धव आणि राज ठाकरे यांना लगावला.