Breaking News

पेनटाकळी प्रकल्प अभियंत्याच्या संगनमताने गौण खनिजाची चोरी!

म्हणे जेसीबीचा आवाजच आला नाही, पत्रकारांच्या प्रश्‍नाला अभियंत्याचे हास्यास्पद उत्तर

बुलडाणा, दि. 19 - शहरातील पेनटाकळी वसाहतीत शासनाच्या अधिपत्याखाली असलेले पेनटाकही प्रकल्प कार्यालय सद्या अत्यंत चर्चेत आले ते गौण खनिजाचे  उत्खनन आणि चोरीमुळे. प्रकल्प अभियंते वाकचोरे यांच्या दालनापासून अगदी हाकेच्या अंतरावरुन दिवसाढवळ्या जेसीबीद्वारे गौण खनिजाचे अत्खनन करुन  चोरी झाल्याचा प्रकार आज उजेडात आला. 
सदर बाब मेहकर तालुका पत्रकार संघाच्या काही पदाधिकार्‍यांच्या निदर्शनास येताच त्यांनी सुजाण भारतीय नागरिक या नात्याने गौण खनिज चोरीचा  प्रकार अभियंते वाकचोरे यांना प्रत्यक्ष स्पॉटवर नेवून दाखविला. तेव्हा गौण खनिजाची चोरी झाल्याचे त्यांनी मान्य करतांनाच मला जेसीबीचा आवाजच आला  नाही. असे हास्यापद उत्तर पत्रकारांशी बोलतांना दिले. विशेष म्हणजे ज्या ठिकाणाहून शेकडो ब्रास गौण खनिज दिवसाढवळ्या चोरुन नेले. तेथून जवळच पेन  टाकळी प्रकल्प विभागातील कर्मचार्‍यांचे निवासस्थान आहे. त्यामुळे चोरीचा हा प्रकार अभियंत्याच्या संगनमतानेच झाला असल्याची चर्चा आहे.
पेनटाकळी प्रकल्प कार्यालयाच्या अख्त्यारीत असलेल्या जागेतून नियमबाह्यरित्या खोदकाम करुन मुरूम नेला जातो. हा प्रकार एक दोन दिवसातला  नसून गेल्या अनेक वर्षापासून सुरू असल्याचे त्या ठिकाणी पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांना बघितले की, लक्षात येते. एकीकडे शासन पर्यावरणाचा र्‍हास  रोखण्यासाठी उपाययोजना करीत असतांना पेनटाकळी प्रकल्प कार्यालयाचे अभियंता मात्र गौण खनिज उत्खननाला मुकसंमती देत आहेत की काय? असा प्रश्‍न  पडतो. अधिकार्‍यांच्या संगनमताने होणार्‍या या उत्खननामुळे परिसरातील टेकड्या भूईसपाट झाल्या आहेत. तर शासनाचा लाखो रुपयांचा महसूलही बुडाला आहे.  शासनाचे झालेले हे नुकसान संबंधित अधिकार्‍यांकडून वसूल करावे अशी भुमिका या वेळी पत्रकारांनी घेतली.
गौण खनिज प्रकरणाला तडीस नेण्यासाठी मेहकर ता.पत्रकार संघाचे अध्यक्ष्य रमेश चव्हाण, शंकरराव धावटेकर, संजय चव्हाण, विनोद झाल्टे, दत्ता  उमाळे, डॉ.श्याम सावळे, निलेश नाहटा, मुन्ना ठाकूर, पृथ्वीराज चव्हाण, शे.अलीम, समाधान बोडखे, सुनिल मोरे, किशोर गायकवाड, विवेक देशमुख, देविदास  खनपरे, विष्णु वाघ, नुरखान सादीक कुरेशी, गणेश पाटील, रविंद्र वाघ, गजानन दुतोंडे, मुन्ना काळे, कैलास राऊत,  एजाज खान आदिंची उपस्थिती होती.
बावीस वर्षापासून साहेब एकाच जागी
पेनटाकळी प्रकल्प कार्यालयाचे अभियंता आर.एच.वाकचोरे हे 1994 पासून याच विभागात कार्यरत आहेत. कुठल्याही अधिकार्‍याला शासन नियमांप्रमाणे दोन  वर्षानंतर इतर ठिकाणी बदलीवर जावे लागते. मात्र असे असतांना वाकचोरे साहेबांवर या विभागाची तथा वरिष्ठांची एव्हढी कपादृष्टी का? वाकचोरे यांचे काम  एव्हढे चांगले आहेत की, गौण खनिजवाल्यांशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध असल्याने वरिष्ठांनी तब्बल 22 वर्षे त्यांना एकाच ठिकाणी ठेवले असा संशय बळावत  आहे.
गौण खनिज चोरीचा पंचनामा
पेनटाकळी प्रकल्प कार्यालय परिसरात करण्यात आलेल्या गौण खनिज चोरीचा पंचनामा तहसीलदार संतोष काकडे यांच्या आदेशावरुन मंडळ अधिकारी चनखोरे व  तलाठी गायकवाड यांनी गौण उत्खननाच्या घटनास्थळी दाखल होवून नुकानीचा पंचनामा केला. तसा अहवाल तहसीलदार यांच्याकडे दाखल केला आहे.  याप्रकरणी महसूल प्रशासनाकडून पोलिसांकडे तक्रार दाखल होणार असल्याची चर्चा आहे.