Breaking News

सर्व्हिस लाईनचे पाणी नागरीकांच्या घरात! नागरिक त्रस्त; न.पा.चे अक्षम्य दुर्लक्ष

बुलडाणा, दि. 06 - केशव नगरापासून ते सरस्वती नगरापर्यंत  असलेली नाली बांधकाम नसल्याने तुंबल्या आहेत.  सदर नालीचे अतिशय घाण पाणी  नागरीकांच्या घरात शिरण्यास सुरुवात झाली असून  नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या नालीमुळे रोगराई पसरत असल्याचे दिसून येत आहे.  याबाबत नगर पालिकेने तातडीने कारवाई करुन नाली बांधकाम करुन द्यावे अशी मागणी परिसरातील नागरीक करीत आहेत.
बुलडाणा नगर पालिका शहरातील सर्व नागरिकांकडून नियमितपणे करवसूली करीत असते. मात्र असे असतांनाही नागरी सुविधा देण्यात नगर पालिका  प्रशासनाचे आजवर दुर्लक्ष झाल्याचे दिसून आले आहे.  परिसरातील नागरिक आपला करदेखील नियमित पालीकेकडे भरत असतात. अशा स्थितीत या परिसरात  नागरी सुविधा पुरविण्यासाठी नगर पालिका प्रशासनाने दक्ष असणे गरजेचे आहे. मा. या परिसरात गेल्या अनेक वर्षांमध्ये नालीचे बांधकाम करुन सांडपाण्याचा  निचरा योग्य पध्दतीने होण्यासाठी प्रयत्नच झाले नाहीत. त्यामुळे या प्ररिसरात एक नाली तर वर्षानुवर्षापासून इतकी तुंबली की आता त्या नालीचे पाणी थेट  नागरीकांच्या घरांमध्ये घुसत आहे. नागरीकांच्या घरातून सांडपाणी बाहेर जाण्यास जागाच उरली नसल्याने नागरिकांच्या त्रासात अधिकच भर पडली आहे.  नालीतच डुकरांचा मुक्त संचार असल्याने मोठ्या प्रमाणात रोगराईदेखील वाढल्याचे दिसून येत आहे.
या परिसरातील काही जागरुक नागरिकांनी या परिसरात नालीचे योग्य बांधकाम व्हावे यासाठी नगर पालिकेकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात आला.  मात्र त्यांना योग्य प्रतिसाद प्रशासनाकडून मिळाला नाही. कंटाळलेल्या नागरिकांनी आता आंदोलनाच्या पवित्र्यात आले असून नालीचे बांधकाम लवकर न झाल्यास  आंदोलन करण्याचा इशारा परिसरातील रहिवाशी अ‍ॅड.जयसिंग देशमुख यांनी दिला आहे.