Breaking News

जिल्ह्यातील दोन गुंड एक वर्षासाठी स्थानबद्ध

सांगली, दि. 01 - मिरज व कवठेमहांकाळ येथील दोन गुंडाच्यावर झोपडपट्टीदादा प्रतिबंधक कायद्यानुसार एक वर्षासाठी स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली  आहे. मतीन चमन मलीकसाहेब उर्फ मतीन काझी (वय 22 रा. टाकळी रोड, मिरज) व ज्ञानेश्‍वर पंडीत सुतार (वय 30 रा. विद्यानगर, कवठेमहांकाळ) अशी या  दोन गुंडाची नावे आहेत.  सहा महिन्यात 27 जणांना मोक्का तर 6 जणांच्यावर झोपडपट्टीदादा प्रतिबंधक कायद्यानुसार कारवाई करण्यात आली आहे. अजूनही गुन्हेगारांच्या दोन टोळ्या रडारवर असल्याची माहीती पोलीस अधिक्षक दत्तात्रय शिंदे यांनी दिली.  
जिल्ह्यातील कायदा व सुव्यस्थेला बाधा पोहचविणार्‍या गुंडाची गय केली जाणार नसल्याचे सांगत अधिक्षक शिंदे म्हणाले, जिल्हा पोलीस दलाचा पदभार स्विकारुन  सहा महिने झाले. या काळात तब्बल 4 टोळ्यांतील 27 जणांच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. तर 4 गुंडाच्यावर झोपडपट्टीदादा प्रतिबंधक  कायद्यानुसार स्थानबध्दतेची कारवाई करण्यात आली होती. यामध्ये आणखी दोघांची भर पडली आहे. मिरज शहर तसेच ग्रामीण, महात्मा गांधी पोलीस ठाण्यात  खूनाचा प्रयत्न, खंडणी, अपहरण, दंगा तसेच मारहाण केल्याप्रकरणी  4 गुन्हे दाखल असलेल्या एम. डी. गँगचा म्होरक्या मतीन काझी याच्यावर स्थानबध्दतेची  कारवाई करण्यात आली आहे.
याशिवाय ज्ञानेश्‍वर सुतार या वाळूतस्करावरही कारवाई करण्यात आली आहे. ज्ञानेश्‍वर सुतार याच्यावर कवठेमहांकाळ व अन्य पोलीस ठाण्यात वाळू चोरी,  सरकारी कामात अडथळे आणणे, सरकारी कर्मचार्‍यांना मारहाण करणे,  दंगा करणे, गंभीर दुखापत करणे यांसारखे 8 गुन्हे दाखल आहेत. वेळोवळी कारवाई  करुनही त्यांच्या गुन्हेगारी कारवाया सुरु होत्या, यामुळे जिल्हाधिकार्‍यांच्याकडे त्याच्यावर झोपडपट्टीदादा प्रतिबंधक कायद्यानुसार कारवाई करण्यासाठी प्रस्ताव  पाठविण्यात आला होता. त्या प्रस्तावास त्यांनी मंजूरी दिली आहे.
झोपडपट्टीदादा प्रतिबंधक कायदा व मोक्का कायद्याची यापुढच्या काळात प्रभावी पणे अमंलबजावणी करण्यात येईल असे सांगत अधिक्षक शिंदे म्हणाले, या  कायद्यामुळे गुंडाच्यावर कारवाई केल्यास त्यांच्यावर वचक निर्माण होतो. त्यांच्या टोळ्या बरखास्त होतात. गुन्हेगारी कारवाया थंडावतात. प्रसंगी गुन्हेगारीच्या  माध्यमातून त्यांनी मिळविलेली संपत्तीवरही टाच आणता येत असल्याने मोक्का व झोपडपट्टीदादा प्रतिबंधक कायद्याचा प्रभावी वापर करण्यात येईल. गुंडाची डोकी  वर निघणार नाहीत, याची खबरदारी घेण्यात येत आहे. यासाठी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांच्या अधिकार्‍यांना या दोन कायद्यांची अमंलबजावणी करण्याच्या  सूचना देण्यात आल्या आहेत. ते म्हणाले सहा महिन्याच्या काळात आतापर्यंत 6 जणांच्या विरोधात झोपडपट्टीदादा प्रतिबंधक कायद्यानुसार तर 4 टोळ्यांतील 27  जणांच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.