Breaking News

भविष्यात अंतराळातही सहली काढू : झेलम चौबळ

। ‘अमेरिकेतील नासायन’ पुस्तकाचे थाटात प्रकाशन

अहमदनगर, दि. 18 - केवळ सहली काढून पैसा कमविणे हा केसरीचा उद्देश नाही.या सहलींतून माणसं घडावीत,विद्यार्थी घडावेत हाच उद्देश आहे. ‘नासा’ टूर्स  मधून प्रेरणा घेऊन एक विद्यार्थी जरी शास्त्रज्ञ झाला तरी आमचे प्रयत्न सार्थकी लागल्याचे समाधान मिळेल, परंतू आदित्य देवचक्के याने ‘अमेरिकेतील नासायन’  पुस्तक लिहून एक पाऊल पुढे टाकले आहे. त्याचे हे काम कौतुकास्पद आहेच; परंतू या पुस्तकामुळे आमचाच हुरूप वाढलेला आहे. आता ‘केसरी’ भविष्यात  अंतराळातही टूर्स काढू शकते, असा मानस केसरी टूर्सच्या संचालिका झेलम चौबळ-पाटील यांनी व्यक्त केला.
नगर मधील आदित्य अनिरूध्द देवचक्के याने लिहिलेल्या ‘अमेरिकेतील नासायन’ या पुस्तकाचे प्रकाशन सोमवारी चौबळ यांच्या हस्ते झाले. त्यावेळी त्या बोलत  होत्या. जिल्हाधिकारी अनिल कवडे या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी होते. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवीन्द्र बिनवडे, साहित्यिक डॉ.संजय  कळमकर, रेणुकामाता मल्टिस्टेटचे चेअमरन प्रशांत भालेराव, हिंद सेवा मंडळाचे मानद सचिव सुनिल रामदासी यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
चौबळ-पाटील म्हणाल्या की, केसरीने आजपर्यंत सहलींसोबत माणसं कमाविण्याचं काम केलं.कोणत्याही शहरात गेलं की, हक्काची माणसं भेटतात.केसरी सोबत  टूर्स केलेल्या माणसाचे,विद्यर्थ्यांचे आयुष्यच बदलून जाते. आदित्य देवचक्के हे त्याचेच उदाहरण आहे.आम्ही त्यांना नॉलेज टॅबलेट देतो.केवळ सहल हा उद्देश मुळीच  नाही. नगर सारख्या छोट्या शहरातील आदित्य सारखी मुलं पुस्तक लिहितात.हीच खरी तर आमची कमाई आहे. त्याचे हे पुस्तक आमच्या पुढच्या सहलीतील  सहभागी विद्यार्थ्यांसाठॅ प्रेरणादायी ठरेल, असे त्या म्हणाल्या.
जिल्हाधिकारी कवडे म्हणाले की, प्रत्येकाने आपले अनुभव शब्दबध्द केले पाहिजेत. आपल्याला जे समजले, जे दिसले ते इतरांना सांगण्याचे पुस्तक हे महत्वाचे  माध्यम आहे.आदित्यनेे लिहिलेले नासायन हे इतरांसाठी प्रेरणादायी ठरेल, कारण त्यात त्याच्या भावना आहेत, देशाबद्दल प्रेम, समकालिन पिढी बद्दलचे मत आहे.  अनिरूध्द देवचक्के यांच्याप्रमाणे प्रत्येक पालकाने आपल्या मुलांवर संस्कार करायला हवेत तरच पालक-पाल्य नात्यातील अंतर कमी होऊ शकते.
डॉ.कळमकर म्हणाले की, आपल्याकडे प्रवासाला जाण्याची पध्दत आहे.मात्र नको ती वर्णनं आपण सांगत असतो. मात्र, आदित्य सारखा दहावी-अकरावीत  शिकणारा मुलगा ‘नासा’ला जातो.आणि तेथील अनुभवांवर पुस्तक लिहीतो,हे त्याच्या पिढीतील विद्यार्थ्यांनीच नाही तर सर्वच प्रवांशांनी शिकण्यासारखे आहे. जे  दिसले, जे वाटले, अनुभवले ते आदित्यने पुस्तकात उतरविले आहे. त्याच्या लिखाणातील हाच सच्चेपणा वाचकांना आवडतो.तो ‘नसायन’ मध्ये आहे.
आजचे पालक मुलांच्या भौतिक गरजा भागवितात.मात्र त्यांची‘बौध्दिक’गरज काय आहे, हेच पालकांच्या लक्षात येत नाही, असे सांगताना त्यांनी आपल्या खास  शैलीत पालकांचा आणि पाल्यांचाही समाचार घेतला. वडील संपादक असल्याने हे पुस्तक त्यांनी लिहीले की काय, असा गैरसमज होण्याची शक्यता होती, मात्र  आदित्यने सुमारे 20 मिनिटे व्यक्त केलेल्या आपल्या मोकळ्या मनोगतातून ती सपशेल फोल ठरविली आहे. त्याचाच जास्त आनंद वाटला, असे ते म्हणाले.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवीन्द्र बिनवडे म्हणाले की, आदित्यने नासायन लिहीले आहे.त्याचे हे पुस्तक आमच्या जिल्हा परिषदेच्या शाळेतील  विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक ठरेल. कारण आमचे 42 विद्यार्थी इस्रोच्या सहलीवर गेले आहेत. त्यांच्या ‘इस्रोयन’ साठी ‘नासायन’चा नक्कीच उपयोग होईल, असे  सांगून ते म्हणाले की, प्रवास करायचा असेल तर पायला भिंगरी पाहिजे. पैसा ही दुय्यम बाब आहे. नियोजन केल्यास गरिबालाही ते जमू शकते. युरोपमध्ये  असताना मीही नियोजन करून प्रवास केला. केसरी सोबत प्रवास केल्याच्या आठवणीही त्यांनी सांगितल्या.