Breaking News

मिरा महाजनी यांना नाट्य परिषदेचा नाटय गौरव पुरस्कार जाहीर

अहमदनगर, दि. 19 - येथील नाट्य क्षेत्रातील शिखर संस्था असलेल्या अ.भा.म.नाट्य परिषदेची  अहमदनगर जिल्हा शाखा  व सामाजीक क्षेत्रात अग्रेसर  असणारी रोटरी क्लब मिडटाउन यांच्या संयुक्त विद्यमाने स्व.अनिल (बालीकाका) क्षीरसागर यांच्या स्मरणार्थ राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचे आयोजन करण्यात  आले आहे.
बालीकाका यांना नगरच्या नाट्यकर्मींकडुन ही स्पर्धा म्हणजे एक प्रकारची श्रद्धांजली असल्याचे नाट्य परिषद मध्यवर्ती मुबंईचे सहकार्यवाह सतीश लोटके यांनी  सांगितले.
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या वतीनें दरवर्षी नाट्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणा-रा अहमदनगर जिल्ह्यातील रंगकर्मीस नाट्य गौरव पुरस्कार प्रदान  करून सन्मानित करण्यात येत असतो यंदाच्या वर्षी अहमदनगरच्या हौशी रंगभूमीवरील एक जेष्ठ व्यक्तिमत्व सौ. मीरा अरुण महाजनी यांना अखिल भारतीय मराठी  नाट्य परिषदेच्यावतीने दिला जाणारा नाटय गौरव पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात येत आहे, अशी माहिती नाट्य परीषद नगरचे अध्यक्ष क्षितिज झावरे  यांनी दिली. सौ. मीरा अरुण महाजनी ह्या अहमदनगरच्या हौशी रंगभूमीवरील एक जेष्ठ व्यक्तिमत्व असून मुंबई येथे विवाहापूर्वी अनेक नाटकातून त्यांनी वेगवेगळ्या  भूमिका साकारल्या. नाट्यक्षेत्रात कार्यरत असणारे राम मुंगी व  सुधीर मुंगी या बंधूंच्या  प्रोत्साहन आणि पाठबळामुळेच नाट्य क्षेत्रात आल्याचे त्यांनी सांगितले.  योगशिक्षिका असणा-या मीरा महाजनीं  यांना पती डॉ.अरुण महाजनी यांनी कलेसाठी कायम खंबीर साथ दिली. ’वेगळ व्हायचय मला’, ’राजाच्या पोरीच लगीन’  , ’कोणाचा कोणाला मेळ नाही’ या नाटकासह ’एकच प्याला’  या संस्कृत नाटकात त्यांनी  विविध भूमिका जिवंत केल्या व त्याकरीता त्यांना अभिनयाचे अनेक  पुरस्कार प्राप्त झाले. पुढे शाहिर साबळे यांच्या ’महाराष्ट्र दर्शन’ या कार्यक्रमातत्यांनी सहभाग नोंदवला. 1992-93 साली  राज्य नाट्य स्पर्धेत ’स्पर्श’ या   नाटकासाठी त्यांना  सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचे रौप्य पदक तत्कालीन सांस्कृतिक मंत्री श्री विलास राव देशमुख यांच्या हस्ते मिळाले.  मीरा महाजनी यानी ’मसीहा’ या  नाटकात 85 वर्षाची गृहिणी अणि बारबाला अशी लक्षवेधी  दुहेरी भूमिका करून अभिनयाची प्रगल्भता सिद्ध केली. ’लव्ह बर्ड’, ’हमिदाबाई ची कोठी’  या  नाटकांमधून  मुख्य भूमिका  साकारून अभिनयाच्या प्रशास्तिपत्रकाच्या त्या मानकरी ठरल्या.दल सरकार यांच्या ’बाकी इतिहास’  या हिंदी नाटकात त्यांनी  सशक्त अशी व्यक्तिरेखा साकारली. ’जाणुन-बुजून’ ,या नाटकासह ’सासुबाई अणि संभाजी’,  ’दुभंगलेलं अतीत’ या एकांकिका , ’बाहुली’ हां लघुपट या सह  अनेक नाट्य आणि सांस्कृतिक कार्यक्रमात त्यांनी  सक्रीय योगदान दिले. नाटकातून विविध भूमिका साकारत असताना  सामाजिक जाणीव ठेवत महिला  सबलीकरणा साठी महिला पतपेढ़ी चालवून गरजुना कर्ज पुरवठा करणे, योग विद्या धाम येथे 21 वर्ष योगाचा प्रचार आणि प्रसार करने हे त्यांच्या व्यक्तिमत्वाचे  दर्शन घडवतात.