Breaking News

खादीला ‘संघमय’ करण्याचा डाव!

दि. 16, जानेवारी - भारत सरकारच्या खादी ग्रामोद्योग आयोगाकडून प्रकाशित होत असलेल्या दिनदर्शिका व डायरीवरील महात्मा गांधीचे छायाचित्र हटविल्यामुळे  मोठा गहजब उडेल अशी विरोधकांची अपेक्षा होती मात्र ती सध्या फोल ठरतांना दिसत आहे. खादीचा वसा तसा भारतीयांसाठी जुना. मात्र या खादीचा प्रचार प्रसार  करण्याचे, व खादीचे कपडे वापरण्यास प्रोत्साहन देण्याचे महत्वपुर्ण काम महात्मा गांधीने केले. इतकेच नव्हे तर काँगे्रसमध्ये सहभागी होणार्‍या सदस्यांना त्यांनी  सुतकताई करणे सक्तीचे केले होते, त्यामागचा मुख्य उद्देश असा की सुताची निर्मिती मोठया प्रमाणात होऊन देशातील प्रत्येकाला खादीचे कपडे उपलब्ध होईल.  त्यामुळेच महात्मा गांधी आणि खादी यांचे एकप्रकारे अतुट असे नाते आहे. मात्र खादी ग्रामोद्योग आयोगाकडून, महात्मा गांधीचे छायाचित्र हटवुन तिथे पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांचे छायाचित्र छापण्यात आले. अर्थात यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने भाष्य करणे टाळले असले, तरी त्यातुन संघाची  रणनिती स्पष्ट होत आहे. भारतीय राजकारणाचा विचार केला असता, संघ बुध्दीभेद करण्यात पटाईत आहे. त्यामुळे भाजपाला सर्वसमावेशक पक्ष करण्यासाठी  संघाकडून जीवाचा आटापिटा चालु आहे. त्यामुळेच सरदार वल्लभभाई पटेल यांना आपल्याकडे खेचण्यात भाजपाने जो प्रयत्न केला तसाच काहीसा प्रयत्न आता  महात्मा गांधीच्या बाबतीत देखील होत आहे. मात्र येथे महात्मा गांधीला आपलेसे न करता, त्यांना हटवुन मोदी यांनी आपल्या छबीचा मोठया खुबीने वापर केला  आहे. अर्थात मोदी यांनी आतापर्यंत किती सुत कताई केली हा यक्ष प्रश्‍न आहे. कारण फोटो काढण्यासाठी सुतकताई करणे वेगळे. महात्मा गांधी हे आपल्या  जीवनात रोजच्या जीवनातील काही वेळ सुतकताईसाठी देत असत, याचा विसरच खादी ग्रामोद्योग महामंडळाला पडला असावा. महात्मा गांधी यांचे पणतू तुषार  गांधी यांनी ‘तेरा चरख़ा ले गया चोर, सूनले बापु ये पैग़ाम, मेरी चीट्ठी तेरे नाम.’ असे ट्विट करून त्यांनी आपली नाराजी उघड केली.10 लाखांचा सूट आवडणार्‍या  पंतप्रधानांना देण्यात आली आहे, अशी उपहासात्मक टीकाही त्यांनी आपल्या ट्विटमध्ये केली आहे.गांधीजी आणि त्यांचा चरखा हे भारतीय स्वातंत्र्य लढ्याचे प्रतिक  आहे. त्यातून प्रेरणा घेऊन देशभरात हजारो जण आजही काम करताहेत. गांधीजींनी चरख्यावर सूत कातणे हे स्वावलंबनाचे प्रतिक मानले जाते. जगभरात  गांधींजींचा आदर केला जातो. आपलीही तशीच प्रतिमा तयार करण्यासाठी मोदींनी पंतप्रधान झाल्यानंतर कसोशिने प्रयत्न करण्यात येत आहे, त्याचाच भाग म्हणून  त्यांनी चरख्यावर सूत कातण्याचा प्रतिकात्मक प्रयत्न केला असून, तीच छबी आता खादी व ग्रामउद्योगच्या दिनदर्शिकेवर आली. यावर कडी म्हणजे पंतप्रधान  कार्यालयाने दिलेले स्पष्टीकरण. अर्थात हा खुलासा, स्पष्टीकरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना न विचारता झाला नसेल. त्यामुळे तो खुलासा पंतप्रधानांचाच आहे,  असे मानण्यास पुरेसा वाव आहे. पंतप्रधान मोदी हे खादी वापरतात त्यामुळे देशात खादी विक्रीच्या प्रमाणात वाढ झाली. हा जो अजब खुलासा पंतप्रधान  कार्यालयाने केला आहे, त्यातील त्यांचा बाळबोध उत्तर समोर येते. एखादा व्यक्ती ती गोष्ट वापरतो, म्हणजे तो बॅ्रण्ड होवु शकतो का? त्या गोष्टीसाठी त्या  व्यक्तीचे किती कष्ट आहे, त्यासाठी त्या व्यक्तीने काय केले आहे. हे न बघता, तपासता, ती व्यक्ती केवळ ती गोष्ट वापरते म्हणून जर तुम्ही बॅ्रण्ड म्हणत असाल,  तर ते अंधानुकरणाचे लक्षण आहे. सशक्त लोकशाहीमध्ये विभुतीपुजेला कवडीमोल किंमत नाही. मात्र देशातील महत्वाचा पदावरील व्यक्तीकडून नेहमीच व्यक्तीपुजेचे  स्तोम माजवण्यात येत आहे. त्यातलाच हा प्रकार आहे. त्यामुळे महापुरूषांचे विचार आत्मसात न करता, त्यांचे बाह्य गुण स्वीकारून, उदात्तीकरण करून, आपण  ही तसेच असल्याचा भास खादी प्रकरणावरून समोर येत आहे.