Breaking News

सातार्‍यात बहुजन समाजाचे क्रांती मोर्चाद्वारे शक्तीप्रदर्शन

दि. 16, जानेवारी - सविधानाच्या सन्मानार्थ, अ‍ॅट्रॉसिटी कायद्याच्या समर्थनासह महिलाच्यावरील अत्याचार निवारण्याचे कायदे अधिक कडक करावेत, यासह  कोपर्डी घटनेतील आरोपींना लवकरात लवकर शिक्षा व्हावी, भारतीय संविधानाला कोणताही धक्का लावला जाऊ नये, अशा मागण्यांसाठी सातार्‍यात बहुजन  क्रांती मोर्चा काढण्यात आला. मोर्चामध्ये बौध्द, ओबीसी, एनटी, व्हीजेएनटी तसेच मुस्लिम समाजासह तळागाळातील मागासवर्गीय समाजातील बांधवांनी सहभागी  होऊन शक्ती प्रदर्शन करत बहुजनांच्या शिस्तबध्दतेचे प्रदर्शन केले.  
सातारा नगरपालिकेसमोरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून मोर्चास सुरुवात झाली. मोर्चा राजवाड्यावरून राधिका रोड मार्गे पोवई  नाक्यावर आला. त्यानंतर मोर्चाचे रुपांतर सभेत झाले. यावेळी रिपब्लिकन पक्षाच्या विविध संघटना, बहुजन मुक्ती पार्टीच्या संघटना, ओबीसी संघटना,  बाराबलुतेदारांच्या संघटना, अल्पसंख्यांक समाजातील संघटनांमध्ये ख्रिश्‍चन समाज, भटकेविमुक्त, घिसाडी, विविध समाजातील आघाडीच्या कार्यकर्त्यांनी  आपापल्या समाजबांधवांना प्रवाहात येण्याचे आवाहन केले. त्यानंतर प्रातिनिधीक स्वरुपात अमोल बनसोडे, सतीष रावखंडे, आयेषा पटणी, सुषार मोतलिंग, डॉ.  अनिल माने, तेजस माने, आनंदराव लादे यांनी जिल्हाधिकार्‍यांना मागण्यांचे निवेदन दिले. सातार्‍यातील मुस्लिम बांधवांनी मोर्चात सामील होवून सर्व धर्म  समभावाची शिकवण दिली, तसेच बहुजनांच्या एकजुटीला सलाम केला. विशेष म्हणजे या मोर्चा मध्ये युगपुरुषांच्या नावाने घोषणा बाजी करण्यात येत होती. पण  या मोर्चात छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची वेशभूषा परिधान करून आलेल्या कार्यकर्त्यांकडे पाहून उपस्थित  युवक-युवतींनी उस्फूर्तपणे घोषणाबाजी केली. सर्वत्र बहुजन पर्व संचारल्यामुळे पुरोगामी समजणार्‍या कार्यकर्त्यांचा सहभाग हा मोर्चाला नैतिक बळ देणारा ठरला.