Breaking News

अमित देशमुख यांच्या विरोधातील याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

लातूर, दि. 14 - लातूर शहर विधानसभा मतदार संघाचे आमदार अमित देशमुख यांनी मर्यादेपेक्षा अधिक खर्च केला म्हणून त्यांच्या निवडीला  आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. मुंबई उच्च न्यायालयाने  या बाबत दिलेला निकाल कायम ठेवत आमदार अमित देशमुख यांची  निवड वैध ठरवली आहे. सन 2014 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत लातूर शहर मतदार संघातून आमदार अमित देशमुख हे 02 लाख 03 हजार 453  मतापैकी 01 लाख 19 हजार 653 एवढी मते घेऊन विजयी झाले होते. या निवडणुकीत फक्त 400 मते घेऊन अनामत रक्कम जप्त झालेले पराभूत उमेदवार अ‍ॅड.  अण्णाराव पाटील यांनी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपिठात याचिका दाखल करुन आमदार अमित देशमुख यांच्या निवडीला आव्हान दिले होते. निवडणूक  आयोगाने घालून दिलेल्या खर्च मर्यादेपेक्षा आमदार अमित देशमुख यांनी जास्तीचा खर्च केला आहे असे नमूद करुन या कारणास्तव त्यांची निवड रद्द करावी अशी  विनंती त्यांनी या याचिकेत केली होती. या याचिकेत मोघम स्वरुपाचे आरोप करण्यात आले असून शिवाय याचिका कायद्यानुसार नसल्याचे स्पष्ट करुन ती  याचिका उच्च न्यायालयाने 18 एप्रिल 2016 रोजी फेटाळून लावली होती. उच्च न्यायालयाच्या या निर्णयाला आव्हान देत अ‍ॅड. अण्णाराव पाटील यांनी पुन्हा सर्वोच्च  न्यायालयात याचिका दाखल केली होती. ज्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने नोटीस काढली होती. सदरील प्रकरणात आमदार अमित देशमुख यांनी अ‍ॅड. दिलीप  अण्णासाहेब तौर यांच्या मार्फत हजर होऊन शपथपत्र दाखल केले. हे प्रकरण 12.01.17 रोजी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमुर्ती श्री.गोगई व न्यायमुर्ती श्री.भुषण  यांच्या खंडपिठासमोर अंतिम सुनावणीसाठी निघाले सर्वोच्च न्यायालयाने दोन्ही बाजूचे म्हणने ऐकून घेतल्यानंतर उच्च न्यायालयाचा निकाल कायम ठेवत अ‍ॅड.  अण्णाराव पाटील यांनी दाखल केलेली याचिका फेटाळून लावली.