Breaking News

सामान्य जनतेला अर्थसाक्षर करण्याचा प्रयत्न स्तुत्य : ठाकूर

कराड, दि. 01 (प्रतिनिधी) : शतक महोत्सवी वाटचाल करणार्‍या कराड अर्बन बँकेची वाटचाल कौतुकास्पद असून बँकेने सर्वसामान्य ग्राहकांना डिजिटल  व्यवहारासंबंधी माहिती देवून त्यांना अर्थसाक्षर करण्याचा केलेला प्रयत्न स्तुत्य आहे, असे प्रतिपादन अर्थतज्ज्ञ चंद्रशेखर ठाकूर यांनी केले. ते कराड येथील  यशवंतराव चव्हाण सदन येथे आयोजित ‘आज रोख, उद्या डिजिटल’ या विषयावरील व्याख्यानप्रसंगी बोलत होते.   
सध्याच्या नोटाबंदीच्या पार्श्‍वभूमीवर सामान्य जनतेचे प्रबोधन व्हावे तसेच त्यांना कॅशलेस व्यवहाराची माहिती देवून त्यांना अर्थसाक्षर करण्यासाठी कराड अर्बन  बँकेने अर्थतज्ज्ञ चंद्रशेखर ठाकूर यांचे ‘आज रोख, उद्या डिजिटल’ या विषयावरील व्याख्यानाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमास अर्बन कुटुंबप्रमुख सुभाषराव  जोशी, बँकेचे अध्यक्ष डॉ. सुभाष एरम, उपाध्यक्ष समीर जोशी, मुख्य कार्यकारी अधिकारी सीए. दिलीप गुरव यांच्यासह बँकेचे संचालक, कराडमधील विविध  संस्थातील पदाधिकारी, सेवक, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कराड अर्बन बँकेच्या शतक महोत्सवी वर्षानिमित्त बँकेने सध्याच्या आर्थिक परिस्थितीचा  विचार करून या व्याख्यानाचे आयोजन केले होते.
चंद्रशेखर ठाकूर म्हणाले, आपण यापुढे डिजिटल व्यवहाराकडे वळले पाहिजे. येणारे युग हे डिजिटल युग आहे. त्यामुळे आधुनिकता स्विकारण्याची आपण  मानसिकता ठेवली पाहिजे. जर आपण रोखीने व्यवहार न करता डिजिटल पध्दतीचा वापर केला तर त्याद्वारे व्यवहारामध्ये पारदर्शकता येवून करचुकवेगिरीला  आळा बसेल आणि कराच्या रूपाने जास्तीत जास्त रक्कम सरकारी तिजोरीत जमा होवून तोच पैसा देशाच्या प्रगतीसाठी उपलब्ध होऊ शकेल. नोटाबंदीमुळे सर्वच  ठिकाणी व्यापारावर परिणाम झाला आहे. याचा विचार करून आता पेटीएमचा वापर सुरू झाला आहे. त्यामुळे आपण पेटीएम, वॉलेट सारख्या साधनांचा वापर  करून व्यवहार केले पाहिजेत. यासाठी सर्व्हीस देणार्‍या विविध कंपन्या आहेत. त्याचा वापर करून व त्याची पध्दती समजून घेवून व्यवहार केले पाहिजेत. स्मार्ट  फोन, सेव्हींग खाते व एटीएम कम डेबीट/क्रेडीट कार्ड याचा वापर करून आपण वॉलेट वापरून पेमेंट करू शकतो. पेमेंट करण्याच्या या साध्या, सोप्या पध्दतीचा  अवलंब केला तर व्यवहारात सुलभता येऊ शकेल.
यावेळी त्यांनी पॉईंट ऑफ सेल, वॉलेट तसेच चलनी नोटांशिवाय सुरळीत व्यवहार कसे होऊ शकतात, वॉलेट वापरायला किती सोपे आहे, विविध बिलांची रक्कम  अदा करण्याची सोपी प्रणाली याबाबत स्लाईड शोद्वारे केले. प्रारंभी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सीए. दिलीप गुरव यांनी प्रास्ताविक व स्वागत केले. शेवटी  बँकेचे उपाध्यक्ष समीर जोशी यांनी आभार मानले.