Breaking News

लोकशाहीत जनता हीच तर खरे राजे - खा. उदयनराजे

सातारा, दि. 16 - लोकशाही व्यवस्थेत आपला प्रतिनिधी ठरविण्याचे सर्वाधिकार जनतेला आहेत. लोकशाही प्रणालीमध्ये मतदार जनता हीच खरी  राजा आहे. आगामी जिल्हा परिषद, पंचायत निवडणुकीसाठी योग्य उमेदवारालाच संधी दिली जाईल, असे प्रतिपादन खासदार उदयनराजे भोसले यांनी केले.  आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर सातारा तालुक्यातील शेंद्रे गटाचा कार्यकर्ता मेळावा सोनगाव कार्यालयात झाला. यावेळी ते  बोलत होते.
उदयनराजे म्हणाले, ‘जनतेमुळे आम्ही आहोत. आमच्यामुळे जनता नाही, या गोष्टींचा विसर लोकप्रतिनिधींना पडता कामा नये. तसेच जनतेनेही  लोकप्रतिनिधींकडून हक्काने कामे करून घेतली पाहिजेत. येणार्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांनी सज्ज राहावे.
यावेळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रवी साळुंखे, माजी शिक्षण सभापती सुनील काटकर, सदस्य संदीप शिंदे, सदस्या वनिता पोतेकर, माजी उपसभापती सूर्यकांत  पडवळ, सुनील सावंत, ऍड. अंकुशराव जाधव, पांडुरंग नावडकर, मोहनराव जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.
 यावेळी सांबरवाडी ग्रामपंचायतीचे सदस्य विनोद भणगे, रवी जांभळे, प्रतिभा भणगे यांनी खासदार उदयनराजे भोसले गटात जाहीर प्रवेश केला. तसेच यावेळी  सुवर्णा ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेच्या नूतन अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व संचालकांचा खासदार उदयनराजे भोसले यांच्या हस्ते जाहीर सत्कार करण्यात  आला. तसेच यावेळी कारी या गावातील काही कार्यकर्त्यांनी खासदार गटात प्रवेश केला. यावेळी जिल्हा परिषद उपाध्यक्ष रवी साळुंखे, सुनील काटकर, सूर्यकांत  पडवळ, वनिता पोतेकर, धनराज जाधव यांनी मनोगत व्यक्त केले.