Breaking News

बिहारचे सिंघम मराठमोळे आयपीएस अधिकारी शिवदीप लांडे मुंबई पोलिसात

मुंबई, दि. 13 - बिहारचे सिंघम अशी ओळख असलेले मराठमोळे आयपीएस अधिकारी शिवदीप लांडे यांची मुंबईत बदली होत आहे. मुंबई पोलिसातील अँटी नार्कोटिक सेलमध्ये उपायुक्तपदी लांडे रुजू होत आहेत. शिवदीप लांडे यांनी वैयक्तिक कारणासाठी महाराष्ट्रात नियुक्तीची विनंती केली होती. त्यानुसार पुढील तीन वर्षासाठी लांडे यांना महाराष्ट्रात पाठवण्यात येणार आहे.
2006 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी असलेले शिवदीप लांडे हे सध्या बिहारच्या स्पेशल टास्क फोर्समध्ये अधीक्षक आहे. त्यांच्या बेधडक कामाच्या पद्धतीमुळे ते बिहारमध्ये चांगलेच प्रसिद्ध आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांची लांडे यांना सोडण्याची इच्छा नव्हती, मात्र सिंघम शिवदीप लांडे यांना स्वगृही म्हणजे महाराष्ट्रात परतायचं होतं. अँटी नार्कोटिक हा मुख्य प्रवाहातील विभाग नसला तरी ड्रगमाफियांच्या मुसक्या आवळण्याचा लांडेंचा निर्धार आहे.
पाटणा इथं डॅशिंग काम करून, एसपी शिवदीप लांडे अख्ख्या बिहारच्या गळ्यातील ताईत बनले आहेत. मात्र शिवदीप लांडे यांनी गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात महाराष्ट्रात परतण्यासाठी अर्ज केला होता. या अर्जाची मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दखल घेत, गृहविभागाला अर्जाची प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याचे आदेश दिले होते. शिवदीप लांडे यांनी बिहारच्या गुन्हेगारी विश्‍वात दहशत बसवली आहे. अशा अधिकार्‍याची महाराष्ट्राला गरज आहे. शिवदीपने महाराष्ट्रात गुन्हे अन्वेषण किंवा दहशतवादविरोधी पथकात काम करावं अशी आमची इच्छा आहे असं शिवदीप लांडे यांचे सासरे आणि महाराष्ट्रातील जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे म्हणाले होते. शिवतारे हे शिवसेना नेते आहेत. त्यांना आपल्या जावयाचा अभिमान आहे. लांडेंने केलेल्या कारवाईंचे ते अनेकवेळा दाखले देत असतात.