Breaking News

हॉटेलचा सर्व्हिस चार्ज ऐच्छिक, केंद्र सरकारचा ग्राहकांना दिलासा

नवी दिल्ली, दि. 03 - हॉटेलच्या बिलामध्ये आकारला जाणारा सर्व्हिस चार्ज अनेकदा ग्राहकांसाठी डोकेदुखी ठरतो. मात्र यापुढे सर्व्हिस चार्जच्या नावाखाली आकारले जाणारे पैसे देणं बंधनकारक नसेल. सर्व्हिस चार्ज द्यायचा की नाही हा पूर्णपणे ग्राहकांचा ऐच्छिक निर्णय असेल, असा आदेश सरकारनं दिला आहे.
अनेक हॉटेल्समध्ये सर्व्हिस चार्जच्या नावाखाली ग्राहकांकडून छुपी टीप उकळली जाते. अनेक हॉटेलांत सर्व्हिस चार्ज आकारल्यानंतरही वेटर टिप स्वीकारतात.  मात्र यापुढे हॉटेलच्या बिलामधील सर्व्हिस चार्ज म्हणून आकारले जाणारे पैसे द्यायचे की नाही हे तुम्ही ठरवायचं आहे.
सर्व्हिस चार्जच्या नावे पाच ते वीस टक्क्यांपर्यंत रक्कम उकळली जाते, अशा तक्रारी अनेक ग्राहकांनी केल्या होत्या. ग्राहकांना सेवा कशी दिली गेली आहे, यावर  सर्वसामान्यपणे वेटरला दिली जाणारी टिप ठरते. मात्र सर्व्हिस चार्ज म्हणून ग्राहकांकडून सरसकट काही रक्कम घेतली जाते, याविरोधात अनेकांनी तक्रार केली  होती. ग्राहक संरक्षण कायद्या अंतर्गत अशी अन्यायकारक लूट होत असल्यास ग्राहक संबंधित ग्राहक मंचाकडे तक्रार नोंदवू शकतात. केंद्र सरकारच्या ग्राहक तक्रार  निवारण विभागाने हॉटेल असोसिएशन ऑफ इंडियाकडून याबाबत स्पष्टीकरण मागवलं. त्यानंतर सर्व्हिस चार्ज हा ऐच्छिक असून ग्राहक सेवेबाबत संतुष्ट नसल्यास  सर्व्हिस चार्ज देणं नाकारु शकतो, असा निर्वाळा देण्यात आला.