Breaking News

स्वत:च्या लेखनाची समीक्षा लेखकाला करता आली पाहिजे ः सुभाष किन्होळकर

विदर्भ साहित्य संघाकडून किन्होळकरांचा सत्कार

बुलडाणा, दि. 22 - प्रत्येक लेखकाने आपण स्वत: लिहिलेल्या लेखनाची स्वत:च प्रथम त्रयस्थपणे समीक्षा करावी म्हणजे आपल्या लिखाणातील कच्चे दुवे  आपल्याच लक्षात येतात. मी माझ्या लेखनाची समीक्षा स्वत:च करत आल्याने माझ्या लिखाणातील कच्चे दुवे दूर करण्यात मला यश प्राप्त झाले. आज मराठी  लेखकांच्या वाट्याला क्वचितच समीक्षक मिळतो. नवोदित लेखकांच्या वाट्याला समीक्षक लाभत नाहीत. त्यामुळे लेखकांनाच आपल्या लेखनाची समीक्षा करता  आली पाहिजे, असे मत कादंबरीकार सुभाष किन्होळकर यांनी व्यक्त केले. 
काल बुलडाणा येथे विदर्भ साहित्य संघ व सहर ए-गजल अकादमीच्या वतीने सुभाष किन्होळकर यांच्या झळ या कादंबरीला विदर्भ साहित्य संघाचा  कादंबरी लेखनाचा राज्यस्तरीय पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. सत्काराच्या अध्यक्षस्थानी सुप्रसिद्ध गजलकार डॉ.  गणेश गायकवाड होते. सुभाष किन्होळकरांच्या वाङ्मयीन कार्यकर्तृत्वाचा आढावा नरेंद्र लांजेवार यांनी घेतल्यानंतर प्रा.ई.जी.धांडे यांच हस्ते सुभाष किन्होळकरांचा  शाल-श्रीफळ व स्मृतीचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. सोबतच डॉ. गणेश गायकवाड, प्रा.रमेश वानखेडे, शाहिणा पठाण, रविकिरण टाकळकर, अमोल  सातपुते, विलास सपकाळ, प्रा.रविंद्र इंगळे चावरेकर, सुरेश साबळे, इत्यादींनी सुभाष किन्होळकरांचा सत्कार केला. याप्रसंगी प्रा. ई.जी.धांडे यांनी सुभाष  किन्होळकर यांच्या बालकविता, ललित लेखन, कथालेखन तसेच कादंबरी लेखनावर प्रकाश टाकला. डॉ. गणेश गायकवाड यांनी सुभाष किन्होळकरांमधील लेखक  हा सर्वसामान्य व्यक्तिंचे सुख-दु:ख आपल्या साहित्यातून आपल्या परिसरातील बोलीभाषेत मांडत असल्याबद्दल किन्होळकरांचे अभिनंदन केले.
डॉ.मधुसुदन सावळे यांनी याप्रसंगी उपस्थितांचे आभार मानले. या सत्कार सोहळ्यास प्रा. डॉ. इंदुताई लहाने, प्रा.डॉ.सौ.वंदना काकडे, सौ. जया  सुर्यवंशी-शिर्के, प्रतिभा भुतेकर, प्रेषित सिद्धभट्टी, डॉ.विजया काकडे, अमरचंद कोठारी, डॉ. आशिष बारोटे, अनिल अंजनकर, विलास देशमुख, प्रा. डॉ. महेश  रिठे, महेंद्र सौभागे, पंजाबराव गायकवाड, प्रा. निशिकांत ढवळे, ना.है.पठाण सर, विवेक चांदूरकर, अजय दराखे, राजेंद्र मोरे, शहाजी बोरसे, प्रशांत रहाणे, डॉ.  अनिल महाजन, मिलींद चिंचोळकर, इ. प्रामुख्याने हजर होते.